विद्यापीठ परीक्षांच्या सर्वच कामांवर बहिष्कार टाकणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करावी, असे राज्यपालांचे आदेश आणि शासन निर्णय असताना दुसरीकडे जे अधिव्याख्याते परीक्षेची मॉडरेशन किंवा मूल्यांकनासारखी कामे करू इच्छितात त्या कामापासून विद्यापीठ त्यांना रोखत आहे. त्यामुळे अशा शिक्षकांमध्ये  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विरोधात प्रचंड रोष असून कुलगुरू, प्र-कुलगुरू किंवा परीक्षा नियंत्रकाकडे मूल्यांकन मिळावे यासाठी गेलेल्या शिक्षकांना वेगवेगळी कारणे सांगून कटवले जाते. कुलगुरू प्र-कुलगुरूंकडे बोट दाखवतात, प्रकुलगुरू परीक्षा नियंत्रक आणि ३२(५) या नियमाकडे बोट दाखवतात तर परीक्षा नियंत्रक प्र- कुलगुरूंकडे बोट दाखवून स्वत:ची जबाबदारी झटकतात.
सरकार व विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या संपकरी प्राध्यापकांवर कठोर कारवाई करा, असे निर्देश राज्यपालांनी विद्यापीठाच्या कुलगुरूंना दिल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले आहे. गेल्या ८८ दिवसांपासून विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रस्तरीय प्राध्यापकांची संघटना एमफुक्टो बेमुदत संपावर असून सर्व प्रकारच्या परीक्षांच्या कामावर त्यांनी बहिष्कार टाकला आहे. प्राध्यापकांच्या मागण्या मान्य करणे अशक्य असल्याचे वेळोवेळी शासन स्तरावरून सांगण्यात आले आहे. त्यामुळे परीक्षेच्या कामात सहकार्य न करणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना यापूर्वी कुलगुरूंना दिलेल्या आहेत. आता राज्यपालांनी तर पत्राद्वारे स्पष्ट आदेशच दिले आहेत. असे असतानाही विद्यापीठाची बोटचेपी भूमिका पाहता विद्यापीठ प्रशासन आता प्राध्यापक संघटनांच्या नेत्यांच्या हातचे बाहुले झाल्याचे चित्र आहे.
परीक्षाविषयक कामे अभ्यासमंडळ ठरवत असते, असे वरकरणी सांगितले जात असले तरी मॉडरेशन, पेपर सेटिंग, मूल्यांकनाची कामे कुणाला द्यायची यावर प्राध्यापक संघटनांच्या नेत्यांचा प्रभाव आहे. स्वत:च्या नात्यातील सांगकाम्या सोयींच्या प्राध्यापकांकडे ही कामे सोपवून जी मनापासून मूल्यांकन करून शासनाला आणि विद्यार्थ्यांना सहकार्य करू इच्छितात, अशा प्राध्यापकांना मूल्यांकनापासून जाणीवपूर्वक दूर ठेवले जात आहे.
मूल्यांकनाचे काम करू इच्छिणारे हे सहाय्यक प्राध्यापक प्राध्यापक संघटनांचे नेते, कुलगुरू, प्रकुलगुरू आणि परीक्षा नियंत्रक या चौकडीच्या फेऱ्यात अडकले आहेत.