दुष्काळग्रस्त बुलढाणा जिल्ह्य़ाला दिलासा
संततधार पावसामुळे अकोला-बुलढाणा सीमावर्ती व सातपुडा पर्वतराजीतील वाण धरण ६५ टक्के भरले आहे. या धरणात सध्या ५४.४० दलघमी जलसाठा जमा झाला असून ४०४ मीटर पाणी पातळी झाली आहे. वाण धरणाच्या निर्मितीपासून जून महिन्यात पहिल्यांदाच अध्र्यापेक्षा अधिक धरण भरले आहे.
वाण धरणातील पाणी साठवण्याची क्षमता ८२ दलघमी असून मागील वर्षांत हे धरण १०० टक्के भरले होते. त्यामुळे या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांची पिण्याच्या पाण्यासाठी रेलचेल होती. मे महिन्याच्या अखेपर्यंत धरणात ३० दलघमी जलसाठा शिल्लक होता. यावर्षी पावसाळा सुरू होताच जून महिन्यातच संततधार पाऊस पडत असल्याने धरण ६४ टक्के भरण्यास सोयीचे झाले. गेल्या आठवडय़ापासून तालुक्यासह मध्य प्रदेशातील पर्वतीय क्षेत्रात संततधार पाऊस पडला आहे. त्यामुळे वाण धरणात ५४.४० दलघमी जलसाठा जमा झाला असल्याची माहिती वाण प्रकल्पाच्या शेगांव कार्यालयातून देण्यात आली. मागील वर्षांच्या पावसाळ्यात पाच वेळा दरवाजे उघडून वाण नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते. याही वर्षी तशीच परिस्थिती राहणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. पावसाळ्यात धरणाचे दरवाजे उघडून वाण नदी वाहती ठेवली, तर वाण नदी काठावरील गावाच्या भूगर्भ पातळीत वाढ होते, तसेच होणे तालुक्यातील शेतकऱ्यांना अपेक्षित आहे. जून महिन्याच्या सुरुवातीलाच धरण अध्र्यापेक्षा अधिक असल्याने लवकरच १०० टक्के धरण भरणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात चार ते पाच वेळा धरणाचे दरवाजे उघडले गेले, तर वाण नदी वाहती होऊन या परिसरातील भूगर्भातील पाणी पातळी वाढणार आहे. ४१२ मीटर पाणी पातळी क्षमता असलेल्या या धरणात सध्या ४०४ मीटर पाणी पातळी झाली आहे.
आज जिल्ह्य़ात ३७.३० मि.मी. पाऊस झाला असून त्याची टक्केवारी २.८६ अशी आहे. जिल्ह्य़ात तालुकानिहाय पडलेला पाऊस मि.मी.मध्ये- लोणार ४.००, मलकापूर ४.३, शेगाव १२, जळगाव जामोद २, संग्रामपूर १५, बुलढाणा, चिखली, देऊळगावराजा, मेहकर, मोताळा, नांदुरा व खामगाव येथे पाऊस झाला नाही. १ जून ते आजपर्यंत जिल्ह्य़ात २४९२.७८ मि.मी. पाऊस झाला असून, त्याची सरासरी १९१ अशी आहे.