शहरी दगदगीपासून दूर स्वस्तात आणि सहज उपलब्ध होणारी घरे आणि गावकऱ्यांची सहकाऱ्याची भावना यामुळे मुंबई महानगर परिसरात नोकरी-व्यवसाय करणाऱ्या अनेक अंध कुटुंबियांनी वांगणी गावात आश्रय घेतला आहे. आता मुंबई-ठाण्यात घरांच्या किंमती वाढू लागल्याने कनिष्ठ मध्यमवर्गियांनीही दूरदृष्टीने वांगणीतील तुलनेने स्वस्त घरांचा पर्याय स्वीकारण्यास सुरूवात केली असल्याने या गावाचेही आता शहरात रूपांतर होऊ लागले असले तरी नियतीने आयुष्यात अंधार वाढून ठेवलेल्या दृष्टिहिनांनी २५ वर्षांपूर्वीच वांगणी गावात आसरा घेतला आहे. वांगणीतील प्रभाग क्रमांक सहा, वीर सावरकर नगरातील गजानन चौक परिसरात गावातील बहुतेक अंध कुटुंबे राहतात.
सध्या वांगणी गावात ठिकठिकाणी तब्बल २५० ते ३०० कुटुंबे राहतात. सुरूवातीच्या काळात रहायला आलेल्या या अंध बांधवांनी दिलेल्या माहितीनुसार त्यावेळी येथे दीड खोलीच्या घराचे साधारण २०० ते ४०० रूपये भाडे होते. आता साधारण हजार ते बाराशे रूपये भाडे भरावे लागते. पती, पत्नी आणि मुले असे साधारण त्रिकोणी अथवा चौकोनी कुटुंब. त्यातील पती-पत्नी नोकरी-व्यवसायानिमित्त घराबाहेर. काहीजण लोकल गाडीत तसेच मुंबईतील निरनिराळ्या उपनगरात मोक्याच्या ठिकाणी उभे राहून किरकोळ वस्तू विकतात. काहीजण घरीच खडू, डस्टर, मेणबत्ती. टॉवेल, बांबूपासून खुच्र्या बनविण्याचा उद्योग करतात. काहीजण वस्तीतल्या वाद्यवृंदात, भजनी मंडळात गायक, वादक म्हणून सहभागी होतात. इतर सर्वसाधारण व्यक्तींप्रमाणेच त्यांचा दिवसही सकाळी लवकर सुरू होतो. वस्तीतून गटागटाने निघून ते एकमेकांच्या आधाराने स्थानक गाठून विशिष्ट गाडी पकडतात. बाहेर पांढरी काठी असली तरी घरात त्यांची मुले हाच त्यांचा मुख्य आधार असतात. दाम्पत्य अंध असले तरी अनेकांच्या पुढच्या पिढीत हा अंधार संक्रमीत झालेला नाही. त्यातील काहीजण गावातील जिल्हा परिषदेच्या तसेच खासगी शाळेत जातात. काही कुटुंबांनी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकले आहे.     

जीवनगाणे..
अंधांच्या क्रमिक अभ्यासक्रमात संगीत हा एक विषय असतोच. त्यामुळेच प्रत्येकास संगीताची थोडीफार जाण असतेच. वांगणीतील वस्तीतील काही अंध कलावंतांचाही गुरूकृपा कलामंच आहे. कलामंचचे दोन गट असून त्यापैकी एक भजन तर दुसरे वाद्यवृंदाचे कार्यक्रम करतात. गावातीलच एका स्वयंसेवी संस्थेने त्यांना वाद्यसंच घेऊन दिला आहे. किशोर घडलिंग, गजेंद्र पगारे, भारती खोचरे, बाळासाहेब शिंदे आणि इतर प्रसंगानुरूप निरनिराळ्या ठिकाणी कार्यक्रम सादर करतात.

आपल्या माणसांचे गाव..
वांगणी गावाने सुरूवातीपासूनच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या अंध कुटुंबांना आपले मानले. तत्कालिन सरपंच दिवंगत प्रा. रवि पाटील यांनी त्यांना प्राथमिक सुविधा दिल्या. आता येथील बहुतेक कुटुंबियांकडे रेशन कार्ड आहे. गावातील समाजसेविका डॉ. ताई पाटील यांनी त्यांच्या रुग्णालयात त्यांच्यासाठी विनामूल्य उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी वेळोवेळी शिबिरे आयोजित केली जातात. त्यामुळे मुंबई परिसरात राहण्याची जागा शोधत असणाऱ्या अंध दाम्पत्यांना त्यांचे परिचित शक्यतो वांगणीत-आपल्या माणसांमध्ये राहण्याचा सल्ला देतात.