वारांगनांसाठी दीड महिन्यांपासून रखडलेल्या ‘आधार कार्ड’ नोंदणीला अखेर सोमवारचा मुहूर्त मिळाला. प्रवरा मेडिकल ट्रस्ट, महिला व बालकल्याण विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यातर्फे आयोजिलेल्या या उपक्रमातील अडथळ्यांवर ‘नाशिक वृत्तान्त’ने प्रकाशझोत टाकला होता. सुस्तावलेली संबंधित यंत्रणा कार्यप्रवण झाली आणि सोमवारी अभियानास अखेर सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी १०० महिलांनी या अभियानात सहभाग नोंदविला असून पुढील टप्प्यात जिल्ह्यात चार ठिकाणी हे अभियान राबविले जाणार आहे.
कोणत्याही प्रकारची कागदपत्रे नसल्यामुळे वारांगनांची शासकीय कामकाजात ससेहोलपट होत होती. घरगुती गॅस, विविध शासकीय योजनांचे अनुदान मिळवणे, मुलांचे प्रवेश यासह अन्य कामे रखडली आहेत. राज्य शासनाच्या नव्या आदेशानुसार या महिलांना विना कागदपत्र आधारकार्ड मिळणार आहे. ही मोहीम त्या महिलांपुरता मर्यादित नसून त्यांच्या कुटूंबातील सदस्य यात सहभागी होऊ शकतात. शहर परिसरात प्रवरा मेडिकल ट्रस्ट, महिला बालकल्याण व जिल्हाधिकारी कार्यालयाने महिला दिनाचे औचित्य साधत संबंधित महिलांसाठी आधारकार्ड नोंदणी अभियानाचे आयोजन केले. गुरूवारी छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करत महिलांना आधार कार्ड प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी बोलविण्यात आले. मात्र त्या वेळी अवघ्या तीन महिलांची नोंदणी होत नाही तोच संपुर्ण यंत्रणा बंद पडली. त्यानंतर आधारकार्ड नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी प्रवरा संस्थेच्या कार्यालयात शुक्रवारी अभियान होईल असे जाहीर केले. त्यानुसार शुक्रवारी संस्था कार्यालयात सकाळपासूनच महिलांनी गर्दी करण्यास सुरूवात केली. दुपारचे दोन वाजले तरी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा पत्ता नव्हता. प्रवरा कार्यालयाकडून संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला असता ते संपर्क क्षेत्राबाहेर होते. यामुळे संस्थेने महिला बाल कल्याण विभाग अधिकारी योगिता जोशी तसेच उपजिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. वरिष्ठांच्या सूचनेमुळे शनिवारचा मुहूर्त पुन्हा एकदा मुक्रर करण्यात आला. मात्र, त्या दिवशीही मागील दोन दिवसांची पुनरावृत्ती घडली. महिलांना आल्या पावली परत जावे लागले. परिणामी, सोमवारी दस्तुरखुद महिला बालकल्याण अधिकारी जोशी, जिल्हा नियोजन अधिकारी योगेश परदेशी, प्रियंका पानपाटील प्रवरा कार्यालयात पोहचले. तेथूनच त्यांनी दूरध्वनी केले. तांत्रिक अडचणींचा डोंगर पार करत मग कर्मचाऱ्यांनी आधार कार्ड नोंदणीचे काम सुरू केले. सायंकाळपर्यंत ६० हून अधिक महिला आणि त्यांचे कुटूंबीय अशा १०० जणांनी सहभाग नोंदविला.
दरम्यान, अभियानाला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन पुढील टप्प्यात ते गरवारे पॉईंट, सिन्नर येथील मुसळगाव, मालेगाव, मनमाड आणि लासलगाव येथे राबविले जाणार आहे. या माध्यमातून ५०० हून अधिक महिलांना त्याचा लाभ होईल. भविष्यात महिला बालकल्याण वारांगणाच्या एचआयव्हीबाधित बालकांसाठी आहार विषयक उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे परदेशी यांनी सांगितले.