अतिशय संथगतीने सुरू असलेले वरोरा नाका उड्डाण पुलाचे काम मे २०१४ पर्यंत पूर्ण करा, तीन महिन्यांत तसा प्रगती अहवाल सादर करा अन्यथा दंड करून हे काम रद्द करण्याची ताकीद जिल्हाधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी अजय पाल मंगल कंपनीला दिली आहे. सध्या या कंपनीला दररोज पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला असून तीन महिन्यांनंतर या दंडात वाढ करून दहा हजार रुपये करण्यात येणार आहे.
शेकडो लोकांचे बळी घेणाऱ्या वरोरा नाका उड्डाण पुलाचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ठाणे येथील अजय पाल मंगल या कंपनीला उड्डाण पुलाचे काम दिले आहे. या पुलाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. दोन वर्षांत ही कंपनी उड्डाण पुलाचे पिल्लर उभारण्याचे कामसुद्धा पूर्ण करू शकलेले नाही. त्याचा परिणाम नागपूर मार्गावरील वाहतूक खोळंबली असून अपघातांच्या प्रमाणातसुद्धा वाढ झालेली आहे. या कंपनीला दोन वर्षांत पुलाचे काम पूर्ण करायचे होते. परंतु अजून ५० टक्के काम पूर्ण न झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने कंपनीला दररोज पाच हजार रुपये दंड आकारायला सुरुवात केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तेलंग यांनी अजय पाल मंगल या कंपनीला तशी नोटीस बजावली असून महिन्याकाठी दीड लाख रुपये दंड वसुली सुरू आहे. दंड आकारल्यानंतरसुद्धा काम अतिशय संथ असल्याचे बघून बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी कंपनीला नोटीस बजावली आहे. दरम्यान, गेल्या आठवडय़ात याच मार्गावर झालेल्या अपघातात दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला. त्यामुळे या उड्डाण पुलाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आला असून जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात तातडीची बैठक बोलावली. या बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गुंडावार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राजू भुजबळ, वाहतूक पोलीस निरीक्षक पुंडलिक सपकाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. पी. सिंग, नगरपालिकेचे अभियंता बोरीकर व अजय पाल मंगल कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत उड्डाण पुलाचे काम मे २०१४ पर्यंत पूर्ण करा, अन्यथा सदर काम रद्द करून दंड आकारण्याची ताकीद देण्यात आलेली आहे. काम पूर्ण करण्यासाठी कंपनीकडे आणखी आठ महिन्यांचा अवधी असून त्यातील तीन महिन्यांत कामाच्या प्रगतीचा अहवाल कंपनीला द्यावयाचा आहे. बांधकाम विभागाने तयार करून दिलेल्या या अहवाल पुस्तिकेनुसार काम होत नसेल तर दंड पाच हजारांवरून दहा हजार दररोज करण्यात येणार आहे. त्यानंतरच्या तीन महिन्यांत काम पूर्णत्वाला जात असल्याचे दिसले नाही तर संपूर्ण काम कंपनीकडून काढून घेण्यात येणार असून दुपटीने दंड ठोठावण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सर्व अटी कंपनीने मान्य केल्या असून मे महिन्यापर्यंत काम झाले नाही तर काळय़ा यादीत नाव टाकण्यात येणार आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नागपूर मंडळाचे मुख्य अभियंता सगमे यांनी आज या पुलाच्या बांधकामाची पाहणी केली. त्यांनीही कंपनीच्या अधिकाऱ्यांना मे महिन्यापर्यंत काम करा, अन्यथा काळय़ा यादीत नाव येण्यास तयार राहा, असा इशारा दिला आहे. सगमे यांनी वरोरा नाका पुलासोबतच अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे जिल्हय़ातील नुकसानग्रस्त पुलांची व रस्त्यांची पाहणी केली. तसेच अधिकाऱ्यांकडून रस्त्यांचीसुद्धा माहिती जाणून घेतली.