News Flash

वर्धा जिल्हा सहकारी बँकेची आता सक्तीची कर्ज वसुली

आर्थिक संकटात सापडलेल्या वर्धा जिल्हा सहकारी बँकेने आता कर्ज वसुलीसाठी थकबाकीदारांच्या नावांची यादी सार्वजनिक ठिकाणी लावण्याचा निर्णय घेऊन सक्तीची वसुली आरंभली आहे. थकित कर्ज व

| April 12, 2013 03:58 am

आर्थिक संकटात सापडलेल्या वर्धा जिल्हा सहकारी बँकेने आता कर्ज वसुलीसाठी थकबाकीदारांच्या नावांची यादी सार्वजनिक ठिकाणी लावण्याचा निर्णय घेऊन सक्तीची वसुली आरंभली आहे. थकित कर्ज व चलन तुटवडा यामुळे वर्धा जिल्हा बँक संकटात सापडली आहे. नियमित वेतन मिळत नसल्याने शिक्षक संघटनांनी या बँकेतून खाते काढून ते राष्ट्रीयीकृत बकांकडे वळविले. बँकेला मुख्यमंत्र्यांनी पॅकेज देण्याचे आश्वासन दिले होते, पण मुदत लोटूनही ते मिळाले नाही. सहकार क्षेत्राचे तारणहार केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी वर्धा व बुलढाणा बँकेच्या समस्या सुटू शकणाऱ्या असल्याचे सांगून मदतीबाबत कार्यवाही सुरू असल्याचे उत्तर वध्र्यातील पत्रकार परिषदेत दिले होते.
आता बँकेची आर्थिक स्थिती अधिकच धोकादायक होत असल्याची कबुली बँकेचे अध्यक्ष समीर देशमुख यांनी दिली आहे. वसुली न झाल्यास आगामी हंगामात शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणे शक्य होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बँकेच्या अधिकाऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत सर्व थकबाकीदारांच्या भेटी घेऊन वसुलीची मागणी केली, पण केवळ आठ कोटी रुपयांचीच वसुली झाली. बँॅकेच्या ३१ हजार ६०३ थकबाकीदारांकडे १९७ कोटी ९३ लक्ष रुपयाची थकबाकी आहे. ती वसूल व्हावी म्हणून तीन महिन्यांची नोटीस देण्यात आली. बँकेच्या वसुलीच्या अशा प्रयत्नांना यश न आल्याने शेवटी सक्तीच्या वसुलीचा मार्ग बँक प्रशासनाने स्वीकारला आहे. थकबाकीदार ग्राहकांच्या नावांची यादी विविध कार्यकारी सोसायटी व ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात येणार आहे. तसेच वृत्तपत्रांतूनदेखील अशी यादी प्रकाशित केली जाणार आहे. कर्जवसुलीसाठी जंगम मालमत्ता जप्ती व शेतीच्या लिलावाची कारवाई करण्याचा निर्णय झाला आहे, अशी माहिती अध्यक्ष देशमुख यांनी दिली. बँक वाचली तरच शेतकरी वाचेल. त्यांना पुढील हंगामात कर्ज उपलब्ध करून देता येईल. थकबाकीदारांनी यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही बँकेने केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2013 3:58 am

Web Title: vardha district co oprative bank now start forcefully loan revocery
Next Stories
1 यशासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा हवी -बाबासाहेब जाधव
2 गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारपेठा ‘हाऊसफुल्ल’
3 वृंदावन टाऊनशिपमध्ये बुकिंगवर आकर्षक सूट
Just Now!
X