राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी वर्धा नगरी सर्वधर्म तीर्थस्थळांची पंढरी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट अभिनेते रजा मुराद यांनी केले. एकता सेवाभावी संस्थेतर्फे येथील अग्निहोत्री अभियांत्रिकी महाविद्यालयात विविध क्षेत्रातील सेवाभावींच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रजा मुराद बोलत होते. मराठी अभिनेता अशोक शिंदे व अभिनेत्री रिता जाधव यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी बोलतांना मुराद म्हणाले की, गेल्या ४३ वर्षांंपासून आपण चित्रपट क्षेत्रात काम करीत असून केवळ सवरेत्कृष्ट अभिनय करण्यावरच आपला कटाक्ष राहिलेला आहे. जीवनात चढउतार आले तरी त्यामुळे खचून न जाता पुढचे पाउल टाकत होतो. आईवडील आपले पहिले गुरू असून शिक्षकांनी आपल्यातील कलाकार घडविला. मोठय़ांचा आदर करणारी भारतीय संस्कृ ती ही जगातील सर्वश्रेष्ठ संस्कृती होय, असेही मत त्यांनी व्यक्त केले. अभिनेता अशोक शिंदे व रिता जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त करतांना निर्धार ठेवून परिश्रम करा व आपल्या कामातून आईवडिलांचा विश्वास संपादन करा, असा सल्ला दिला. संस्थाध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी समाजाचे दिशादर्शक असलेल्या कलावंतांनी समाजाला योग्य संदेश देण्याचे कार्य प्रभावीपणे पार पाडल्याचे मत व्यक्त केले. प्रा.टी.जी.मुंडे यांचेही भाषण झाले. उद्योगपती अरुण मराठे, जय महाकाली शिक्षण संस्थेचे सहसचिव सचिन अग्निहोत्री व चित्रपट निर्माते पराग भावसार यांची प्रमुख उपस्थिती होती. ३१ समाजसेवकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. संयोजक अजमतभाई यांनी प्रास्ताविक केले. इमरान राही व अ‍ॅड. इब्राहिम बक्श यांनी सूत्रसंचालन केले.