औरंगाबाद-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस सुरू करावी, सोलापूर-जळगाव रेल्वे पैठणमार्गे न्यावी. त्यासाठी अनुदान मंजूर करावे, यांसह मराठवाडय़ातील रेल्वे विकासासाठी दक्षिण-मध्य रेल्वेचा नांदेड विभाग मध्य रेल्वेशी जोडावा, अशी मागणी शिवसेनेचे उपनेते चंद्रकांत खैरे यांनी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांच्याकडे केली.
मराठवाडय़ातील रेल्वे प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी खैरे यांनी वेगवेगळ्या मागण्यांचे निवेदन रेल्वेमंत्र्यांना दिले. परभणी-मनमाड रेल्वे दुहेरीकरणाचे काम लवकर पूर्ण करावे, नगर-बीड-परळी मार्गासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी, जालना-खामगाव मार्गाला मंजुरी देण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या. रामेश्वर-ओखा रेल्वे नियमित करावी. नांदेड-अमृतसर एक्स्प्रेस जम्मूपर्यंत वाढवावी, औरंगाबाद-पूर्णा-हिंगोली-वाशिम- अकोलामार्गे नागपूर सवरेदय एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी खैरे यांनी केली. मुंबई व दिल्ली या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या रात्रीच्या गाडय़ा सुरू कराव्यात. दीक्षाभूमी एक्स्प्रेस ही साप्ताहिक गाडी नियमित करावी, अशी मागणीही खैरे यांनी केली.
औरंगाबाद शहर व परिसरातील जगप्रसिद्ध लेण्यांमुळे पर्यटनासाठी अनेक लोक येतात. मुंबई-दिल्ली इंडस्ट्रियल कॉरिडोरमध्ये मराठवाडय़ातील बहुतांश भाग येत असल्याने मराठवाडय़ातील रेल्वे विकासाला गती मिळवून देणे आवश्यक आहे, असे खैरे यांनी निवेदनात म्हटले आहे. काही मागण्यांवर रेल्वेमंत्री सकारात्मक असल्याचा दावा त्यांनी केला.