मिरजेत साज-या होत असलेल्या यंदाच्या गणेशोत्सवात आठ गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष मुस्लीम व ख्रिश्चन समाजाचे असून यामुळे यंदाचे उत्सवाचे स्वरूप ख-या अर्थाने सार्वत्रिक झाले आहे. अनेक मंडळांमध्ये अन्य धर्मीय कार्यकर्त्यांचा समावेश झाल्याने शहरातील सामाजिक ऐक्याचा आदर्श समाजापुढे आला आहे.
अजिंक्यतारा गणेशोत्सव मंडळ मंगळवार पेठचे अध्यक्ष सेफ पठाण, श्रीगणेशोत्सव मंडळ मीरासाहेब दर्गा परिसरचे अध्यक्ष इरफान कागवाडे, नदी वेस येथील नृसिंह मंडळाचे इर्शाद मकानदार, तासगाव वेसच्या ओंकार मंडळाचे इकबाल मोमीन आणि होळी कट्टय़ावरील हिंदू-मुस्लीम मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक महमंद मणेर आहे.
शहरातील पाच सार्वजनिक मंडळाचे अध्यक्ष मुस्लीम कार्यकत्रे असून तीन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष ख्रिश्चन कार्यकत्रे आहेत. यामध्ये कोल्हापूर चाळ येथील श्रीगणेश मंडळाचे फ्रन्की राजू फ्रॉन्सिस, ख्वाजाबस्ती येथील ओंकार मंडळाचे थॉमस डेसा आणि रेल्वे कॉलनीतील गजराज यंग बॉइज मंडळाचे रॉड्रिक्स राजू डिसोझा हे अध्यक्ष आहेत.
चार वर्षांपूर्वी मिरज शहरात दोन गटात झालेल्या दंगलीमुळे एक संवेदनशील शहर म्हणून मानले जात असले, तरी समाजातून हा दंगलीचा डाग पुसण्याचा प्रयत्न तरुणाई करत आहे. गणेशोत्सव केवळ विशिष्ट समाजाचा न राहता त्याला सार्वत्रिक स्वरूप प्राप्त होत आहे हेच यावरून दिसून येते.