शहरातील विविध संस्था व संघटनांच्या वतीने त्र्यंबकेश्वर आणि पेठ तालुक्यातील आदिवासी पाडय़ांवर उबदार कपडय़ांसह मिठाई आणि वीज नसलेल्या पाडय़ांमध्ये कंदील वाटप करण्यात आले. प्रत्येक वर्षी अशी समाजोपयोगी मदत करणाऱ्या संस्थांच्या संख्येत वाढ होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
कृतार्थ ज्येष्ठ नागरिक संघातर्फे कपडे वाटप
शहरातील इंदिरानगर परिसरातील कृतार्थ ज्येष्ठ नागरिक संघातर्फे त्र्यंबकेश्वरजवळील कळमुले, जांभुळवाळी, हर्षवाडी, दुगारवाडी या आदिवासी पाडय़ांवरील आदिवासी कुटुंबियांना साडय़ा, उबदार कपडे यांचे वाटप करण्यात आले. कळमुखे गावचे सरपंच नामदेव बुरंगे, चंदर शिवराम यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी संघाचे विनायक पुरोहित, श्रीपाद कुलकर्णी, आदींच्या हस्ते कपडय़ांचे वाटप करण्यात आले.
‘फेस्कॉम’तर्फे कपडय़ांसह मिठाई वाटप
पेठ तालुक्यातील जुनोटी, बोरीची बारी या अतिदुर्गम भागात महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) नगर-नाशिक प्रादेशिक विभागातर्गत ‘अन्नपूर्णा’ या नावाने कपडे, साडी, नारळ अशी ओटी भरून मिठाई वाटप करण्यात आले. त्र्यंबकराव गायकवाड यांच्याकडून १०० चादरी देण्यात आल्या. कालिका देवी मंदीर संस्थानतर्फे १०० साडी पीस, १०० नारळ देण्यात आले. दीड हजारपेक्षा अधिक नागरिकांना या मदतीचा लाभ झाला. यावेळी नाशिकसह, देवळाली कॅम्प, लासलगाव, सिडकोतील त्रिमूती चौक, पाटील लेन येथील ज्येष्ठ नागरिकही उपस्थित होते. याशिवाय गोल्फ क्लब येथेही मोखाडा, जव्हार भागातील सुमारे ४०० आदिवासींना कपडे व मिठाई वाटप करण्यात आली. त्यावेळी उत्तमराव तांबे, लक्ष्मणराव काळे, शिवाजीराव देशमुख, पुष्पलता ठाकूर उपस्थित होते. सर्व कार्यक्रमांचे आयोजन केदुपंत भालेराव यांनी केले
जिल्हा मजूर संघातर्फे कंदील वाटप
पेठ तालुक्यातील दुर्गम अशा ‘झरी’ या पाडय़ावर अद्यापही वीज न पोहचल्याने आ. नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्हा मजूर संघातर्फे कंदील देण्यात आले. तसेच झरी, बोरदा, बेहेडपाडा, सादरपाडा, रानविहीर, अंधृटे, सावर्णे, तोंडवळ,  लिंगावणे, नाचलोंढी, मोपपाडा, माळेगाव, नवापाडा, भायगांव, पेठ येथील आदिवासींना मिठाई देण्यात आली.
यावेळी संघाचे अध्यक्ष राजाभाऊ खेमनार, संचालक राजेंद्र भोसले, प्रमोद मुळाणे, संजय चव्हाण, गणपत चौधरी तसेच पेठमधील मजूर संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
याप्रसंगी पुढील दिवाळीच्या आत झरी या पाडय़ात वीज देण्याचे आश्वासन आ. झिरवळ यांनी दिले.