स्वातंत्र्यसैनिक दादा उंडाळकर यांच्या ३९ व्या स्मृतिदिनामित्त उंडाळे (ता. कराड) येथे कृषी प्रदर्शन, समाजप्रबोधन मराठी साहित्य संमेलन, स्वातंत्र्यसंग्राम सैनिक अधिवेशन व दादा उंडाळकर सामाजिक पुरस्काराचे वितरण अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रतिष्ठानचे विश्वस्त प. ता. थोरात यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली ते म्हणाले, स्वातंत्र्यसैनिक दादा उंडाळकर स्मारक समितीतर्फे दरवर्षी त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त १६ ते १८ फेब्रुवारीदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदा शनिवारी (दि. १६) सकाळी ९ वाजता कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन पाटबंधारे विभागाचे माजी सचिव एल. एम. रानडे यांच्या हस्ते व आदर्श गाव संकल्प आणि प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली होईल. रविवार (दि. १७) सकाळी साडेआठ वाजता २२ व्या समाजप्रबोधन मराठी साहित्य संमेलनास प्रारंभ होईल. ‘सकाळ’ माध्यम समूहाचे संचालक, संपादक उत्तम कांबळे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होईल. अध्यक्षस्थानी लेखक व अभिनेते अभिराम भडकमकर असतील. दुपारी २ वाजता विज्ञान मंच कार्यक्रम होईल. विज्ञान साहित्यिक व संशोधक डॉ. मोहन आपटे त्यास उपस्थित राहतील. रात्री साडेआठ वाजता अमरावती येथील भरत महाराज रेळे व सहकाऱ्यांचे सप्त खंजिरी कीर्तन होईल. सोमवारी (दि. १८) दुपारी २ वाजता राज्यातील स्वातंसैनिकांचे ३० वे स्वातंत्र्यसंग्राम सैनिक अधिवेशन होईल. पुण्यातील गोखले इन्स्टिटय़ूटचे माजी संचालक डॉ. निळकंठ रथ यांच्या उपस्थितीत व प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होईल. याप्रसंगी डॉ. रथ यांना स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार, प्राचार्य डॉ. पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. आमदार विलासराव पाटील-उंडाळकर व स्मारक समितीचे व्यवस्थापकीय विश्वस्त प. ता. थोरात यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.