कोल्हापूर महापालिकेने गुरूवारी राबविलेल्या विशेष वसुली धडक मोहिमेत १ कोटी २३ लाख रूपये वसूल झाले. समक्ष जागेवर ११ लाख ३६ हजार रूपये, तर महापालिकेत १ कोटी १२ लाख रूपये जमा झाले.
संपूर्ण शहरभर तपासणी मोहीम राबविण्यात आली. यामध्ये एकूण ३२६ मिळकतींची तपासणी करण्यात आली. या तपासणी अंतर्गत घरफाळा, एल.बी.टी., महापालिका परवाना फी, पाणी पुरवठा शुल्क आणि इस्टेटकडील भाडे याबाबत सविस्तर तपासणी करण्यात आली. महापालिका राबवित असलेल्या विशेष वसुली मोहिमेंतर्गत एकूण १२ पथके कार्यरत असून प्रत्येक पथकामध्ये घरफाळा, एल.बी.टी. परवाना, पाणी पुरवठा व इस्टेट विभागाकडील १० कर्मचारी याप्रमाणे१२० कर्मचाऱ्यांची स्वतंत्रपणे नियुक्ती करण्यात आली होती. यातील प्रत्येक पथकासाठी एक पथकप्रमुख नियुक्त करण्यात आला असून, प्रत्येक पथकासाठी स्वतंत्रपणे वाहन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ही मोहीम आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त संजय हेरवाडे, अश्विनी वाघमळे,सहायक आयुक्त उमेश रणदिवे, परवाना अधीक्षक विजय वनकुद्रे यांच्या नियंत्रणाखाली राबविण्यात आली.