ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री वर्षां उसगावकर हिने ‘पुढचे पाऊल’ टाकायचे ठरवले आहे. गेले काही वर्ष चित्रपटांपासून कटाक्षाने दूर राहणाऱ्या वर्षां उसगावकर यांनी छोटय़ा पडद्यावरील काही निवडक मालिकांमधूनच काम करणे पसंत केले होते. यावर्षी मात्र मालिका आणि चित्रपट असा दोन्हींचा मुहूर्त वर्षां उसगावकरनी साधला आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘पुढचे पाऊल’ या लोकप्रिय मालिकेत वर्षां उसगावकर यांचा प्रवेश होणार आहे. ‘पुढचे पाऊल’ मालिकेतील सरदेशमुखांचे कुटुंब आणि त्यांच्या प्रमुख अक्कासाहेब यांची बालपणीची मैत्रीण म्हणून वर्षां नव्या भूमिकेत दिसणार आहे.
‘गेले काही वर्ष मी सलग मालिका करत होते. स्टार प्रवाहवरील ‘मन उधाण वाऱ्याचे’ ही मालिका केल्यानंतर आणखीही एक-दोन विनोदी मालिका मी केल्या. त्यात मी एवढी गुंतून पडले की चित्रपटांसाठी वेळही देता येत नव्हता. खरेतर, चित्रपट ही माझी पहिली आवड आहे. ‘पुढचं पाऊल’ मालिकेतली माझी भूमिका ही दीर्घकालीन नाही. त्यामुळे एकतर अडकून पडणार नाही आणि दुसरी म्हणजे ही भूमिका मला आवडली. माझ्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी अशी ती भूमिका असल्याने मी ती स्वीकारली,’ असे वर्षां उसगांवकर यांनी ‘वृत्तांत’शी बोलताना सांगितले.
अक्कासाहेबांची मैत्रिण सौदामिनी देऊळगावकर उर्फ सँडीच्या भूमिकेत वर्षां दिसणार आहे. दहावीपर्यंतचे शिक्षण अक्कासाहेब म्हणजेच राजलक्ष्मी आणि सँडीने एकत्र घेतले. दहावीपर्यंत पहिला क्रमांक पटकावणाऱ्या राजलक्ष्मीला मागे टाकणे सँडीला शक्य झाले नाही. अतिमहत्त्वाकांक्षी अशा सँडीच्या कुटुंबात पहिला क्रमांक मिळवता येत नाही म्हणून सँडीला बोलणी खावी लागली. आज ती स्वत: एका कंपनीची मालकीण आहे. इतक्या वर्षांनंतर भारतात परतलेली सँडी हुशार राजलक्ष्मीला चूल आणि मूल करताना पाहते आणि तिच्या मनातला हा सल जागा होतो. ती ते राजलक्ष्मीला जाणवून देण्याचा प्रयत्न करते. सँडीच्या अकस्मिक येण्याने आणि अकल्पित वागण्याने राजलक्ष्मीवर काय परिणाम होतो, असे वळण वर्षांच्या येण्याने मालिकेला मिळणार आहे. या मालिकेबरोबरच ‘थोडं तुझं थोडं माझं’ या चित्रपटातही वर्षां उसगावकर काम करत असून अजिंक्य देव तिच्याबरोबर मुख्य भूमिकेत आहे.