सलग १४ व्या वर्षी डोंबिवलीतील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे २८ ते ३० एप्रिल दरम्यान सावित्रीबाई फुले नाटय़गृहात वसंतोत्सव साजरा केला जाणार असून त्यानिमित्ताने डोंबिवलीकरांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे.
रविवारी २८ एप्रिल रोजी दुपारी ४.३० वाजता मराठी नाटक सिनेमा, संगीत आणि काव्यसृष्टीत मोलाची कामगिरी करणाऱ्या १६ वसंतांच्या कलांचे सादरीकरण केले जाणार आहे. वसंत प्रभू, वसंत पवार, वसंत देसाई, वसंत आजगावकर, वसंतराव देशपांडे, व.पु. काळे, वसंत कानेटकर, वसंत सबनीस, वसंत बापट, डॉ. वसंत अवसरे, वसंत शांताराम देसाई, वसंतकुमार मोहिते, वसंत आबाजी डहाके, वसंत (राजा) मंगळवेढेकर, वसंत निनावे आणि वसंत सावंत या दिग्गजांच्या कलाकृतींचा त्यात समावेश असणार आहे. नाटय़ स्वगते, कथा आणि कवितांचे सादरीकरण इला भाटे, रजनी वेलणकर, स्पृहा जोशी आणि सुरेश खरे करणार आहेत.
सोमवारी, २९ एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजता सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक आदित्य ओक आणि की-बोर्ड वादक सत्यजित प्रभू शास्त्रीय संगीतापासून ते नटरंगमधील लावणीपर्यंतचा पेटीचा प्रवास उलगडून दाखविणारा ‘जादूची पेटी’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. मंगळवारी रात्री साडेआठ वाजता जुन्या हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमाने वसंतोत्सवाची सांगता होणार आहे.