किर्लोस्कर आणि वसुंधरा क्लब यांच्यावतीने ८ ते ११ ऑगस्ट या कालावधीत किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा त्याचा विषय ‘जल संरक्षण व भविष्यरक्षण’ असा आहे. महोत्सवाच्या निमित्ताने देण्यात येणाऱ्या वसुंधरा मित्र पुरस्कारासाठी निसर्गप्रेमी दत्ता उगावकर, शेखर गायकवाड आणि अजित बर्वे यांची निवड करण्यात आली आहे.
या बाबतची माहिती संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. गंगापूर रस्त्यावरील कुसुमाग्रज स्मारक येथे हा महोत्सव होईल. कुंभमेळा २०१५ – एक चिंतन, कॉर्पोरेट ग्रीन इनिशिएटिव्ह परिषद, छायाचित्र प्रदर्शन व स्पर्धा, माहितीपट स्पर्धा, पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलन, वास्तुविशारद परिषद ही या महोत्सवाची वैशिष्ठय़े ठरतील. ८ ऑगस्ट रोजी छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनाद्वारे महोत्सवास सुरूवात होईल. दुसऱ्या दिवशी म्हणजे ९ तारखेला सकळ व दुपारच्या सत्रात परिषदांचे आयोजन झाल्यावर सायंकाळी सहा वाजता महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन होईल. याच सोहळ्यात वसुंधरा मित्र पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. १० तारखेला सकाळी सात वाजता रामकुंड, मल निस्सारण केंद्राला भेट, दुपारी पर्यावरण प्रेमी साहित्य संमेलन, सायंकाळी चित्रपट प्रदर्शन तर रविवारी सकाळी सातला निसर्ग फेरी रामकुंड, गोदावरी, सकाळी दहा वाजता चित्रपट प्रदर्शन, दुपारी दोनला कुंभमेळा परिसंवाद आणि सायंकाळी सहा वाजता महोत्सवाचा समारोप सोहळा होणार आहे. दर बारा वर्षांनी भरणारा सिंहस्थ कुंभमेळा म्हणजे गोदावरीचा उत्सव. परंतु, गेल्या काही वर्षांत हा उत्सव इतका मोठा व ओंगाळवाणा झाला की संपूर्ण नदीची घुसमट होत आहे. परिसंवादाच्या माध्यमातून नदीवरील अतिक्रमणे, प्रदुषण आदी विषयांवर चर्चा केली जाणार असल्याचे चित्राव यांनी नमूद केले.
नांदुरमध्यमेश्वर उभयारण्य परिसरात निसर्ग व पक्षी रक्षणाचे काम करणाऱ्या दत्ता उगावकर यांची तर १५ वर्षांपासून वृक्ष संवर्धन व जोपासनेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या शेखर गायकवाड यांची यंदाच्या वसुंधरा मित्र पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. गायकवाड हे केवळ वृक्ष लागवडच नव्हे तर तरूणांच्या मदतीने झाडांचे संवर्धन, निगा व त्याविषयी जनजागृतीचे काम करत आहेत.
या पुरस्कारासाठी निवड झालेले अजित बर्वे म्हणजे पर्यावरण क्षेत्रातील अतिशय वेगळा विषय हाताळणारी व्यक्ती. हिरव्या वाचनालयाच्या माध्यमातून ते अनेक घटकांपर्यंत पोहोचले आहेत. महोत्सवास सर्वाना विनामूल्य प्रवेश असून पर्यावरणप्रेमी नागरिकांनी त्यात सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेचे हेमंत बेळे, अमित टिल्लू व प्रतिष्ठानचे लोकेश शेवडे यांनी केले आहे.