इन्स्टिटय़ूट ऑफ सायकॉलॉजिकल हेल्थ (आयपीएच) या संस्थेच्या वतीने ठाणे शहरात गेल्या एक तपाहून अधिक काळ भरणारी वेध व्यवसाय परिषद यंदा कल्याणमध्येही भरवली जाणार आहे. येत्या रविवारी १९ ऑक्टोबर रोजी कल्याणमधील अत्रे नाटय़गृहात सकाळी सात ते दुपारी दीडपर्यंत सृजन संवादाची मैफल रंगणार आहे.
उस्ताद बिस्मिल्लाह खाँ यांचे शिष्य पं. शैलेश भागवत, भूलतज्ज्ञ व जादूगार डॉ. हिमालय पंतवैद्य, पशुवैद्यक अधिकारी डॉ. विनया जंगले, सुप्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशी, दक्षिण आफ्रिकेतील तरुण भारतीय उद्योजक राजीव तेरवाडकर हे मान्यवर कल्याणमधील ‘वेध’ परिषदेत उपस्थित राहणार असून सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.बिस्मिल्लाह यांच्या सनईचे वारसदार म्हणून पं. शैलैश भागवतांचे नाव घेतले जाते. ऑपरेशनच्या आधी भूल देतेवेळी मुलांनी रडू नये म्हणून त्यांना जादू दाखविणारे डॉ. हिमालय पंतवैद्य कालांतराने जादूकलेच्या प्रेमात पडले.
सध्या तर ते अखिल भारतीय जादूगार संघटनेचे अध्यक्षपद भूषवीत आहेत. पशुवैद्यक अधिकारी डॉ. विनया जंगले यांनी वाघ, हत्ती, बिबटय़ा आदी वन्य प्राण्यांच्या पुनर्वसन योजनेत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. ‘उंच माझा झोका’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ फेम अभिनेत्री स्पृहा जोशी एक संवेदनशील कवयित्री-लेखिका म्हणूनही ओळखल्या जातात.
 मूळचे सांगलीकर असणाऱ्या राजीव तेरवाडकरांनी मॅकेनिकल इंजिनीअरिंगची पदवी संपादित करून सुरुवातीला अनेक भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधून नोकऱ्या केल्या.
पुढे अनेक देशांची भ्रमंती केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेत त्यांनी उत्कर्ष आयटी सोल्युशन प्रा. लि. कंपनीची स्थापना केली. या व्यक्तिमत्त्वांच्या यशाचा प्रवास ‘वेध’मध्ये उलगडणार आहे. परिषदेच्या प्रवेशिका चिंतन क्लासेस, ५, माधव गणेश, कल्याण गायन समाजसमोर, टिळक चौक, कल्याण (प.) येथे उपलब्ध आहेत.