मूल्य संस्कारांचा वारसा देणारी चळवळ अशी ओळख असलेल्या बाविसाव्या वेध परिषदेचा प्रारंभ शुक्रवार, १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ विचारवंत डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या बिजभाषणाने होणार असून त्यानंतर पुढील दोन दिवस वेधच्या विविध ज्ञानवर्धक सत्राची रेलचेल ठाणेकर रसिकांना अनुभवता येणार आहे.
ठाण्याच्या गडकरी रंगयतन समोरील श्री समर्थ सेवक मंडळाच्या पटांगणामध्ये वेध परिषद भरणार असून जगण्याचा ताल आणि जगण्याचा तोल या परिषदेतून उलगडला जाणार आहे. डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या शुभारंभाच्या बिजभाषणाच्या कार्यक्रमानंतर दुसऱ्या सत्रामध्ये रात्री ८ वाजता संगीतक्षेत्रामध्ये बालपणीच उतरलेल्या प्रसिद्धीच्या झोतात असूनही उत्तम शैक्षणिक यश संपादन करणाऱ्या आनंद भाटे यांच्या संगीत ते संगणक या प्रवासाचा ताल आणि तोल उलगडला जाणार आहे. शनिवारी कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशीच्या सत्रांची सुरुवात दुपारी तीन वाजता होणार असून त्यामध्ये खेळामध्ये रमलेल्या पूर्वा मॅथ्यू यांच्या संपूर्ण कुटुंबीयांशी संवाद, नामवंत आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या सहसंचालिका मुक्ता अवचट-पुणतांबेकर आणि आयटी क्षेत्रातील उच्चाधिकारी असलेले त्यांचे पती आशीष पुणतांबेकर सहभागी होणार आहेत. ख्यातनाम चित्रकार प्रभाकर कोलते आणि खानदेशात चहा विकणारे राजेश पाटील यांचा ओरिसामध्ये आयएएस अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास व तेथे नक्षलप्रवण भागामध्ये केलेल्या कार्याचा जिवंत अनुभव दुसऱ्या दिवशीच्या शेवटच्या सत्रात घेतला जाणार आहे. वेध परिषदेच्या अखेरच्या दिवशी मेजर जनरल आर. आर. निंभोरकर, इंडोको रेमेडीज या औषध कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर आदिती पाणंदीकर आणि त्यांचे डॉक्टर पती मिल्िंाद पाणंदीकर, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, शिरीष बेरी, संतोष गर्जे यांच्या दृष्टीने जीवनाचा ताल आणि तोल उलगडला जाईल, तर  कार्यक्रमाची सांगता उमेश कामत आणि स्पृहा जोशी यांच्याशी संवादतून होणार आहे.