पावसाळा सुरू झाल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत विविध प्रकारच्या रानभाज्यांचे आगमन उरणच्या बाजारपेठेत झाले आहे. मात्र या भाज्यांची आवक घटल्याने भाज्यांच्या दरातही वाढ झाली आहे. जंगलात अतिक्रमण झाल्यामुळे त्याचा परिणाम या रानभाज्यांवर होत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जाते.
नैसर्गिक देणगी म्हणून जंगलात कोणत्याही प्रकारची लागवड न करता रानभाज्या उगवत असतात. या रानभाज्यांची विक्री करून मिळणाऱ्या अधिक उत्पन्नातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास चांगली मदत होत असते.  जंगलात जाऊन नेमक्या रानभाज्या निवडून त्या बाजारात आणून विक्रीचे काम या समाजातील महिला करत असतात.  कुरडई, जमिनीखाली येणारे करांदे, टाकला, भोकर, कंठवली यांसारख्या रानभाज्या या कालावधीत मिळतात.
रानभाज्या आणि त्याचे औषधी महत्त्व लक्षात घेऊन पावसाळ्यात रानभाज्यांना अधिक मागणी असते. या रानभाज्या या आरोग्यदायक तशाच चविष्ट असल्याने पावसाळ्यात या भाज्यांना मागणी असते. जंगलात दऱ्याखोऱ्यात व डोंगरात या विविध जातींच्या भाज्या आढळतात.
त्या वेचण्यासाठी दिवसभर जंगलाची पायपीट करावी लागत असल्याचे मोरा येथील नाथा कातकरी यांनी सांगितले. सध्या डोंगर व जंगल परिसरात मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण, जंगलाचे सपाटीकरण सुरू  असल्याने जंगलातील रानभाज्यांचे प्रमाण घटू लागल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. त्यामुळे दिवसभर धोका पत्करून जंगलात पायपीट करूनही हवी त्या प्रमाणात भाजी मिळत नसल्याने भाजीचे दर वाढवावे लागल्याची माहिती बेबी कातकरी या भाजी विक्रेत्या महिलेने दिली. तीन रुपयांची जुडी पाच रुपयांना विकावी लागत आहे. कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत न वापरता केवळ नैसर्गिकदृष्टय़ा उगवणाऱ्या अनेक भाज्यांचा आस्वाद घेणे हे शरीरासाठी लाभदायक असल्याचे मत डॉ. पाठक यांनी व्यक्त केले आहे.