महालक्ष्मी आणि गणेशोत्सवानंतर पितृपक्षात भाज्या स्वस्त होतील,  अशी आशा असताना काही भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे भाव कमी होण्याची कुठलीही चिन्हे दिसत नसून सामान्य नागरिकांना येणाऱ्या दिवसात या भाववाढीचा फटका बसणार आहे. किरकोळ बाजारातील काही भाज्यांचे भाव स्थिर आहेत, तर काहींचे भाव पाच ते सहा रुपयांनी वाढले आहेत. कांद्याचे भाव अजूनही उतरले नसून किरकोळ बाजारात ७० ते ८० रुपये प्रमाणे त्याची विक्री केली जात आहे.  बहुतेक सर्व भाज्या महाग झाल्यामुळे घरातील बजेट विस्कळीत झाले आहे. शिवाय पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ होण्याचे संकेत असून येणाऱ्या दिवसात भाज्यांचे भाव आणखी वाढण्याची चिन्हे असल्याची शक्यता भाजी विक्रेत्यांनी व्यक्त केली.
महालक्ष्मीनंतर आता पितृपक्षामध्ये घरोघरी भाज्या मोठय़ा प्रमाणात लागतात. बाजारात भाज्याचे गेल्या एक महिन्यापासून भाव तसेही वाढलेले होते, मात्र गेल्या काही दिवसात भाज्यांची आवक कमी झाल्याने ७ ते ८ रुपयांनी काही भाज्यांचे भाव वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना सध्या तरी दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत नाहीत. आधीच डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढीने त्रस्त झालेल्या नागरिकांना दैनंदिन लागणाऱ्या व जीवनावश्यक असणाऱ्या फळे व पालेभाज्यांच्या दरवाढीला सामोरे जावे लागत असताना सरकारने पेट्रोलच्या किमतीमध्ये दोन आठवडे आधी वाढ केली होती. त्यामुळे पुन्हा जर का वाढ केली तर भाज्या आणखी महाग होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नागपुरात येणारा भाजीपाला जिल्ह्य़ातील आसपासच्या गावांतून आणि आंध्रप्रदेश, नाशिक आणि विदर्भातील अन्य जिल्ह्य़ातून मोठय़ा प्रमाणात येत असतो. बहुतेक भाज्या ४० रुपये किलोच्यावर आहे. या महागाईमुळे गरिबांना चिंता लागली आहे. ग्रामीण आणि शहरी भागात पूर्वी चुलीवर स्वयंपाक केला जात असे. गेल्या काही वर्षांत चुली जाऊन घरोघरी सिलिंडर आले आहे. गोरगरीब झोपडपट्टीत राहणाऱ्यांकडे सुद्धा सिलिंडरवर स्वयंपाक केला जात आहे. सिलिंडरचे भाव वाढल्यामुळे आणि वर्षांला सहा सिलिंडर देण्यात येणार असल्यामुळे पुन्हा एकदा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. मेथी ८० ते १०० रुपये किलो प्रमाणे बाजारात विक्रीला आहे. किरकोळ बाजारात हिरवी मिरची ६० रुपये किलो, कोथिंबीर ११० रुपये किलो, टोमॅटो ५० रुपये , भेंडी ४०, चवळीच्या शेंगा ५० ते ६० रुपये, शिमला मिरची ४० ते ५०, कारले ३० ते ४०, काकडी २५ ते ३०, ढेमस ३० ते ४०, गाजर ३० ते ४०, तोंडले ३० ते ४०, कोहळे १५ ते २०, आले ४० ते ५०, लसूण ८० ते १००, मुळा १५ ते २०, तुरई ६० रुपये, फुलकोबी ४० ते ५०, वांगे ३० ते ४०, गवार शेंगा ४० ते ५० प्रतिकिलो विक्रीला आहे. या दरवाढीचा फटका ग्राहकांबरोबरच लहान हॉटेलचालक, भेळविक्रेते व भोजनालयांनाही बसत आहे. दैनंदिन व जीवनावश्यक गोष्टीचे दर विविध कारणाने गगनाला भिडत आहेत. समोर नवरात्र, दसरा आणि दिवाळी आहे. पुढे जर असाच पाऊस लांबला तर भाज्यांचे नुकसान होईल आणि त्यामुळे भाज्याचे दर चढेच राहतील, अशी प्रतिक्रिया कळमना बाजारपेठेतील भाजी विक्रेत्यांनी व्यक्त केली.