किरकोळ बाजारात भाज्यांचे भाव वाढल्याने महागाईने त्रस्त झालेल्या ग्राहकांवर आणखी आर्थिक भार वाढला आहे. ३० ते ८० रुपये किलो याप्रमाणे बाजारात भाज्यांचे भाव असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. भाज्यांचे भाव कमी होतील ही ग्राहकांची अपेक्षा फोल ठरली आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर नागरिकांना विविध जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ कमी होईल असे वाटत होते, मात्र महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना पुन्हा महागाईचा सामना करावा लागत आहे. हिवाळ्यात भाज्याचे भाव स्थिर होते. मार्च महिना सुरू होताच, उन्हाचा तडाखा जाणवताच भाज्यांचे भाव वाढले आहेत. मधल्या काळात कांद्याला हमीभाव जाहीर करावा यासाठी व्यापारी व  शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे आयात कमी झाल्याने कांद्याच्या भावामध्ये वाढ झाली, ती अजूनपर्यंत कायम आहे. मेथी, आंबटचुका, पालक या पालेभाज्यासुद्धा ३० ते ३५ रुपये किलो प्रमाणे बाजारात विक्रीला आहेत. केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये दीड रुपयाने वाढ केली. डिझेल आणि सिलिंडरमध्ये भाववाढ करण्याचे संकेत दिले. त्यामुळे येणाऱ्या दिवसात भाज्यांचे भाव कमी न होता ते आणखी वाढण्याची शक्यता आहे.
बाजारात ढेमस ८० रुपये किलो प्रमाणे विक्रीला आहे. उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता असल्यामुळे भाज्यांची आवक कमी झाली असल्याची माहिती भाजी विक्रेत्यांनी दिली. कॉटन मार्केटमध्ये गेल्या काही दिवसात काही भाज्यांची आवक कमी झाली आहे. ढेमस ८० रुपये तर पोपट ६० रुपये किलोप्रमाणे विक्रीला असून अन्य भाज्या ३० ते ८० रुपये किलो या प्रमाणे किरकोळ बाजारात उपलब्ध आहेत. कै ऱ्या ८० रुपये किलो प्रमाणे विक्रीला आहेत. या दिवसात पालेभाज्यांचा आस्वाद घेण्याची मजा काही आगळीच असताना भाज्यांचे वाढलेले भाव बघता सामान्य नागरिक एक किलो ऐवजी अर्धा किलो भाजी खरेदी करीत आहे. वांगे आणि कोव्हळे सोडले तर बहुतेक भाज्यांचे भाव वाढलेले आहेत.
आठवडी बाजारातील भाज्यांचे प्रतिकिलोचे दर- कांदा-२० ते २५, लसून- १२० ते १६०, बटाटा-२०, वांगी- १५ ते २० , टोमॅटो- ४० ते ४५, दोडका-२० ते ३०,भेंडी- ३० ते ४०, कारले-२० ते २५, बिन्स- ४०, देशी काकडी-३० ते ४०, पांढरी काकडी- २० ते २५, गवार- २० ते२५, कोबी ४० ते ५०, प्लॉवर-३० ते ३५, हिरवी मिरची-२० ते २५, सीमला मिरची- ३० ते ३५, गाजर ३५, बीट- २५ ते ३०, आले- ६५ व हिरवी काकडी २० रुपये. पालेभाज्या पालक, मेथी, चाकवत, शेपू व राजगिरा २५ ते ३० रुपये किलो प्रमाण विक्रीला आहे.