विलंबाने का होईना पण काही दिवसात संततधार कोसळलेल्या पावसामुळे भाज्यांची आवक कमी झाली असून सरासरी बहुतांश भाज्या शंभर रुपये प्रति किलो, अशा विक्रमी भावावर पोहोचल्या असून येणाऱ्या सणांच्या पाश्र्वभूमीवर हे भाव कुठवर पोहोचतील, याचीच चर्चा घरोघरी होत आहे. तब्बल महिनाभर विलंबाने पाऊस झाला. त्यामुळे भाज्यांची लागवड थांबलेली. त्यातच बागायती शेतीतून येणाऱ्या भाज्यांवर संततधार कोसळली. शेतात पाय ठेवायला जागा नाही. भाज्या तोडणार कशा, असा प्रश्न पडलेला. या पाश्र्वभूमीवर भाज्यांच्या गाडय़ा विक्रीस फि रकल्या नाही आणि त्यामुळे दर गगनाला भिडलेले, असे सध्याचे चित्र आहे.
विदर्भातील सर्वात मोठा भाजीबाजार असणाऱ्या नागपूरच्या फु ले मार्केटमधील व इतरत्र भाज्यांचे भाव प्रति किलो शंभर रुपयावर पोहोचल्याची माहिती आहे. टोमॅटो १०० रुपये ते १२० रुपये प्रति किलोच्या खाली माघार घ्यायला अद्याप तयार नाही.
प्रामुख्याने पेटीबंद असा फ ळांचा दर्जा लाभलेले टोमॅटो संगमनेर, नारायणगाव, दक्षिणेतून मदनपल्ली येथून येत आहेत, असे ठोक विक्रेते राजाभाऊ जोगे यांनी सांगितले. किरकोळ बाजारात फु लकोबी ८०, तर पानकोबी ७० रुपये किलो घ्यावी लागते. लोकप्रिय असणारे वांगे ८० रुपये, तर भरताची वांगी १०० रुपये किलो आहे. सिमला मिरची- १००, पालक- ८०, भेंडी- ७०, मिरची- ६०, कोथिंबीर- ६०, चवळीच्या शेंगा- ८०, दोडके- ८०, गवार- ९०, मटार- १२०, मुंगण्याच्या शेंगा- ८०, दुधी- ७०, वाल- १००, पडवळ- १००, काकडी- ८०, कारले- १००, मेथी- १००, तेंडोळे- ६०, अरबी- १०० रुपये प्रति किलोने उपलब्ध आहे.     किरकोळ भाजीविक्रेते राहुल आंजीकर म्हणाले, ठोकभावातच आम्हाला ७० ते ८० रुपये किलोने भाजी मिळते. ती सामान्य माणसाला १०० ते १२५ रुपये प्रति किलोने विकणे अवघड ठरले आहे. त्यामुळे दहा दिवसांपासून मी हा धंदा तात्पुरता बंद ठेवला आहे.
भाजीबाजारातील ग्राहकांचा कमी झालेला ओघ हेच चित्र दर्शविते. सध्या हीच स्थिती आहे, तर पुढे काय, असा प्रश्न उपस्थित होतो. रक्षाबंधन, गणपती सुरू झाल्यानंतर सणांची रांगच आहे. त्यावेळी नैवेद्याला तरी भाजी ठेवू शकणार काय, अशी चिंता गृहिणी व्यक्त करीत आहेत.
स्थानिक आवक ठप्प, तर बाहेरून येणाऱ्या भाज्याचे भाव गगनाला भिडलेले, अशा स्थितीत अच्छे दिन नव्हे, तर बुरे दिन येण्याचेच संकेत असल्याची प्रतिक्रिया आहे.