नववर्षांच्या आगमनासह बाजारात अपेक्षेपेक्षा जास्त आवक होऊ लागल्याने सर्वच प्रकारच्या भाजीपाल्याचे दर लक्षणीय घटले आहेत. त्यामुळे गृहिणींना मोठाच दिलासा मिळाला आहे. शहरात टॉमॅटो व कोिथबिरीची ५ रुपये किलो भावाने विक्री झाली.
गेल्या काही दिवसांत भाज्यांचे भाव चांगलेच कडाडले होते. आले, कांद्यापासून सर्वच भाज्या महागल्या होत्या. टोमॅटो, कोबी, भेंडी, वांगी यांची ४० ते ५० रुपये किलो दराने विक्री होत होती. परंतु गेल्या आठवडाभरापासून भाजीपाल्याचे दर कमालीचे घसरले आहेत. टोमॅटो, कोबी, भेंडी, वांगे, दोडके, पालक, मेथी या भाज्या आवाक्यात असलेल्या दरात उपलब्ध आहेत. एरवी शंभर रुपये किलो दराने विक्री होणारी कोिथबीर आता मात्र थेट पाच-दहा रुपये दराने विक्री होत होती.
नांदेड शहरात पालेभाज्या िलबगाव, मरळक, नीळा, आलेगाव, खडकी, नाळेश्वर, सुगाव आदी भागांतून मोठय़ा प्रमाणात येतात. टोमॅटो शहरालगतच्या काही गावांसह आंध्र प्रदेश, विदर्भातून दाखल होतात. पालेभाज्यांचे उत्पादन अपेक्षेपेक्षा जास्त झाल्याने दर घसरल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. मेथीची जुडी एक रुपयाला उपलब्ध होत होती. हीच अवस्था पालक, चुका, शेपू या भाज्यांच्या बाबतीत आहे. टोमॅटोची आवक मोठय़ा प्रमाणात झाल्याने बाजारात त्याचा उठाव झाला नाही. परिणामी, पाच रुपये किलो दराने टोमॅटो विक्री झाली.
अपेक्षेपेक्षा जास्त उत्पादन झाल्याने आणखी काही दिवस भाजीपाल्यांचे दर स्थिर राहतील. पुढच्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ापासून भाजीपाल्याच्या दरात वाढ होईल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. भाजीपाल्यासह बोर, जांब, पपई, गाजर आदी फळेही गतवर्षीच्या तुलनेत स्वस्त आहेत, असे सांगण्यात आले.