* १७७ रस्त्यांच्या कडेला सशुल्क पार्किंग
* नौपाडा, उथळसरला सर्वाधिक महाग रस्ते
* २७ ठिकाणी बहुमजली वाहनतळ उभारण्याचा प्रस्ताव
ठाणे शहरातील अपुऱ्या वाहनतळांचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी महापालिकेमार्फत २७ आरक्षित भूखंडांवर बहुमजली वाहनतळ उभारण्याचे गाजर एकीकडे पुढे केले जात असले तरी ठाणे, कळवा, मुंब्रा या तीन प्रमुख शहरांमधील सुमारे १७७ रस्त्यांच्या कडेला वाहने उभी करताना आता वाहनचालकांना पैसे मोजावे लागणार आहेत. महापालिकेने या १७७ रस्त्यांची यादी निश्चित केली असून नौपाडा आणि उथळसर परिसरातील जवळपास प्रत्येक रस्ता ‘महागडा’ ठरविण्यात आल्याने या भागात वाहने उभी करताना चालकांच्या खिशाला चाट पडणार आहे. नौपाडय़ातील राम मारुती रोड, साने गुरुजी मार्ग, महात्मा फुले, मुकुंद आगास्कर मार्ग तसेच तीन हात नाका, तीन पेट्रोल पंप, जांभळी नाका, नितीन कंपनी, कोर्ट नाका, रेल्वे स्थानक परिसरातील प्रमुख रस्त्यांच्या कडेला दुचाकी वाहन उभे करायचे असेल तर कमीतकमी २० रुपये भरण्याची तयारी चालकाला ठेवावी लागेल. तुमचे वाहन चारचाकी असेल तर हा दर ५० रुपयांच्या घरात असेल. सुरुवातीच्या दोन तासांसाठी हे दर निश्चित करण्यात आले असून त्यानंतर प्रत्येक तासाला त्यामध्ये १० ते २० रुपयांची वाढ होणार आहे. नौपाडा, उथळसरच्या तुलनेत मुंब्रा, कळव्यात वाहन उभे करणे तुलनेने स्वस्त पडणार आहे.
महापालिका प्रशासनाने शहरातील वाहनतळांचे एक धोरण निश्चित केले असून रस्त्यांच्या कडेला वाहने उभी करताना पैसे मोजावे लागतील, हे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. या नव्या धोरणामुळे रस्त्यांच्या कडेला होणाऱ्या वाहनांच्या पार्किंगला शिस्त निर्माण होणार असली तरी नव्या वाहनतळांच्या उपलब्धतेचा प्रश्न मार्गी लागेल का, याविषयी मात्र वेगवेगळे मतप्रवाह आहेत. तलावपाळी, शाहू मार्केट, दादोजी कोंडदेव स्टेडियम अशा काही भागांत बहुमजली वाहनतळ उभारण्याचा प्रस्ताव अभियंता विभागाच्या विचाराधीन आहे. ठाण्यातील बाजारपेठा, सरकारी कार्यालये, बँका, शाळा, उद्याने, तलाव अशा गर्दीच्या ठिकाणच्या रस्त्यांची रुंदी १८ ते २४ मीटपर्यंत मर्यादित असल्यामुळे या भागात रस्त्याच्या कडेला वाहने उभी होताच मोठय़ा प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगला शिस्त निर्माण व्हावी तसेच महापालिकेला त्यातून उत्पन्न मिळावे, अशी योजना आखण्यात आली आहे. त्यासाठी ठाणे, कळवा, मुंब्रा परिसरातील सुमारे १७७ रस्त्यांची विभागणी अ,ब,क,ड अशा चार संवर्गात करण्यात आली असून ‘अ’ संवर्गात मोडणाऱ्या रस्त्यांच्या कडेला वाहने उभी करणे महागडे ठरणार आहे.
नौपाडा, उथळसरचे रस्ते ‘महाग’
महापालिकेने शहरातील सर्व रस्त्यांचे सर्वेक्षण करून वेगवेगळ्या संवर्गानुसार रस्त्यांची यादी तयार केली असून तब्बल २९ रस्त्यांचा समावेश ‘अ’ संवर्गात, तर ‘५०’ रस्ते ब संवर्गात नोंदीत करण्यात आले आहेत. या रस्त्यांच्या कडेला वाहने उभी करणे इतर रस्त्यांच्या तुलनेने महाग ठरणार असून नौपाडा परिसरातील तब्बल २१ रस्त्यांचा समावेश अ, ब संवर्गात करण्यात आला असून उथळसर भागातील १५ रस्ते पार्किंगसाठी महाग ठरणार आहेत. मुंब्रा, कळवा भागातील ९५ टक्के रस्ते क, ड संवर्गात मोडणार असून तेथील रस्त्यांवर पार्किंगसाठी पाच रुपयांपासून २० रुपयांपर्यंत दर पडणार आहे.
महागडे रस्ते :
राम मारुती रोड, साने गुरुजी मार्ग, महात्मा फुले मार्ग, मुकुंद आगास्कर मार्ग, तीन हात नाका ते तीन पेट्रोल पंप, तीन पेट्रोल पंप ते वंदना टॉकीज, महापालिका भवन, जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, जांभळी नाका, नितीन कंपनी, खोपट ते गोल्डन डाइज नाका, खोपट रोड ते गावदेवी चौक, कळवा पूल ते कोर्ट नाका, साकेत, रुतुपार्क, वागळे येथील रहेजा रस्ता, टीपटॉप प्लाझा, मूस रोड, अहिल्यादेवी मार्ग.
असे ठरणार पार्किंगचे दर :
‘अ’ वर्गातील रस्त्यांच्या कडेला चारचाकी वाहन उभे करायचे असेल तर पहिल्या दोन तासांकरिता ५० रुपये आणि नंतरच्या दोन ते चार तासांपर्यंत प्रतितास अतिरिक्त दहा रुपये भरावे लागतील. चार तासांपेक्षा तुमचे वाहन अधिक काळ उभे राहिल्यास त्यानंतरच्या प्रत्येक तासाला २० रुपये याप्रमाणे दर आकारला जाईल. दुचाकीसाठी हा दर पहिल्या दोन तासांसाठी २० रुपये, तर नंतरच्या दोन टप्प्यांसाठी ५ आणि १० रुपये असा निश्चित करण्यात आला आहे. ब, क, ड वर्गातील रस्त्यांसाठी हे दर टप्प्याटप्प्याने कमी ठरविण्यात आले आहेत.

* या नव्या धोरणानुसार रस्त्याच्या कडेला दिवसाला ४५७१ दुचाकी, तर २७०३ चारचाकी  उभ्या राहू शकतील, अशी जागा उपलब्ध होईल, असा दावा महापालिका करीत आहे. या पार्किंग धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महापालिका सुमारे चार कोटी रुपये खर्च करून कामे हाती घेणार असून वर्षांला सुमारे १८ कोटी रुपयांचा महसूल या माध्यमातून मिळेल, असा दावा केला जात आहे. दरम्यान, महापालिकेने ज्या रस्त्यांची निवड यासाठी केली आहे, त्या ठिकाणी सद्यस्थितीत वाहने उभे राहत आहेत. त्यामुळे नव्याने जागा उपलब्ध होतील, हा दावा कितपत खरा ठरेल, याविषयी प्रश्न उपस्थित राहू लागले आहेत.