चोरी, घरफोडीचे सत्र सुरू असतानाच शहर परिसरात वाहन चोरीस जाण्याचे प्रकारही वाढत आहेत. सोमवारी वेगवेगळ्या भागांत मालमोटार व कार तसेच एक दुचाकी अशी तीन वाहने चोरटय़ांनी गायब केली. याशिवाय काही ठिकाणी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत घराबाहेर लावलेल्या वाहनांमधील पेट्रोल वा काही सामान लंपास करण्याचे प्रमाणही वाढले आहेत.

मागील काही दिवसांपासून शहरात घरफोडय़ांच्या पाठोपाठ वाहन चोरीला जाण्याचे प्रमाणही वाढले आहे. बंद घरे धुंडाळून चोरटे घरफोडी करत असल्याचे बहुतांश घटनांमधून दिसून येते. वाहन चोरटय़ांना लगाम घालण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याचे चित्र आहे. द्वारका परिसरातील ट्रॅक्टर हाऊससमोर उभी असलेली पाच लाख रुपये किमतीची मालमोटार चोरटय़ाने दुपारच्या सुमारास चोरून नेली. या प्रकरणी धुळे येथील अभियंता नगरमध्ये राहणारे ललित पाटील यांनी भद्रकाली पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. दुसऱ्या घटनेत, जुना गंगापूर नाका येथे अपार्टमेंटच्या वाहनतळात घरासमोर उभी केलेली साडेतीन लाख किमतीची इनोव्हा कार मध्यरात्री चोरटय़ांनी चोरून नेली. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याच घटनेची पुनरावृत्ती जेलरोड येथील जनपथ सोसायटीत घडली. घरासमोर उभी असलेली मोटारसायकल मध्यरात्री चोरटय़ांनी गायब केली. या प्रकरणी सुशील साळवे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सिडको परिसरात दुचाकी वाहने चोरीचा प्रयत्न, वाहनांमधील इंधन वा डिकीतील साहित्य लंपास करणे असे प्रकार घडत आहे. अनेक वाहनांचे टाळे तोडण्याचा प्रयत्न झाल्याने नागरिक धास्तावले आहेत. अतिशय वर्दळीच्या द्वारका परिसरात भर दुपारी चोरटय़ांनी मालमोटार गायब केली. चोऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने पोलिसांनी गस्तीचे प्रमाण वाढवून या प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी केली जात आहे.