चोरीच्या घटनांचा तपास लावण्यात पोलिसांना सहसा यश येत नसल्याची सार्वत्रिक ओरड होत असतांना पोलिस ठाण्याच्या आवारातून गुन्ह्यातील जप्त केलेली दुचाकी शार्विलकाने लंपास केल्याची घटना येथील तालुका पोलीस ठाण्यात घडली. या प्रकरणी कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका गुन्ह्यात पोलिसांनी जप्त केलेली दुचाकी तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आली होती. ही दुचाकी चांगल्या स्थितीत असल्याने अज्ञात शार्विलकाच्या मनात ती ठसली असावी. त्यामुळे त्याने तिच्या जागेवर दुसरी जुनी दुचाकी ठेऊन चांगली दुचाकी तेथून लंपास केली.
हे करताना त्याने जुन्या दुचाकीला पोलीस आवारातील दुचाकीची ‘नंबर प्लेट’ लावून बनवाबनवी करण्याचाही प्रयत्न केला. ही लबाडी लक्षात आल्यावर हवालदार सोमनाथ सोनार यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. तालुका पोलीस ठाण्याचे कार्यालय हे कँम्प पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येते. त्यामुळे या शार्विलकाचा शोध घेण्याची जबाबदारी कँप पोलीस कशी पार पाडतात हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.