मुंबई आणि परिसरात वाहने चोरणाऱ्या एका टोळीतील तिघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांनी चोरलेल्या सहा गाडय़ा जप्त करण्यात आल्या आहेत. यातील मुख्य आरोपी नवघर येथे पोलिसांच्या अंगावर गाडी घालून पळून गेला होता.
वाहने चोरणाऱ्या एका टोळीचा म्होरक्या मोहम्मद अन्सारी (५९) हा नागपाडा येथे येणार असल्याची माहिती वाहन चोरी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीव गावडे यांना मिळाली होती. त्यांनी अलेक्झांड्रा सिनेमाजवळ सापळा लावून अन्सारीला अटक केली. त्याने मालवणी येथील एका वाहनचोरीची कबुली दिली. त्याने दिलेल्या माहितीनुसार या टोळीतील दोन साथीदार कलिम खान आणि राजूभाई उर्फ सिराज यांनाही अटक करण्यात आली. वाहने चोरणारी ही कुख्यात टोळी असून या टोळीने माटुंगा, भायखळा, एमआयडीसी , मेघवाडी, मालवणी आदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरीचे गुन्हे केले आहेत अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांनी दिली. या टोळीकडून आतापर्यंत चोरी केलेल्या सहा गाडय़ा जप्त करण्यात आल्या आहेत. वाहन चोरी विरोधी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गावडे, अनिल गंगावणे, शिवाजी शिवथरे, पोलीस उपनिरीक्षक जयभद्र तांबे आदींनी ही कारवाई केली. अन्सारी याने वाहन चोरून पळत असताना नवघर येथे पोलिसांच्या अंगावर गाडी घातली होती.