लाचखोरीमुळे पूर्वी दोन वेळा कारवाई होऊनही निर्ढावलेला तलाठी राजेंद्र शिंपीला तिसऱ्यांदा लाच घेताना पकडण्यात आले. या कारवाईमुळे महसूल विभागातील लाचखोरी पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, हा लाचखोर तलाठी महिनाभरापूर्वीच धुळे तालुक्यातील वडजाई येथे रुजू झाला होता. लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतरही पुढील कारवाईत संबंधित कसे सुटतात त्याचेच हे उदाहरण होय.
धुळे शहरापासून जवळच असलेल्या वडजाई गावातील अनिल अंकुश देवरे यांची गट क्रमांक १०९ मध्ये एक हेक्टर ९३ आर वडिलोपार्जित शेती आहे. हिस्से वाटणीत काही शेती अनिल देवरेंच्या वाटय़ाला आली. त्यामुळे १२ जुलै २०१३ रोजी दुय्यक निबंधक कार्यालयात नोंदणी केल्यानंतर सुमारे सात दिवसांनी देवरे यांनी तत्कालीन तलाठी यांच्याकडे सातबारा उतारा व तत्सम कागदपत्रांसाठी अर्ज दिला होता. यानंतर तत्कालीन तलाठी यांनी विहित प्रक्रिया पूर्ण करून अभिलेखावर नोंदीही घेतल्या. दरम्यानच्या काळात त्या तलाठय़ांची बदली झाली आणि त्यांच्या जागी राजेंद्र पंडित शिंपी आले. ३१ जानेवारीला देवरे कागदपत्र नेण्यासाठी तलाठी कार्यालयात आले. यावेळी शिंपी यांनी तुमच्या नोंदी रद्द झाल्या असून त्या नवीन कराव्या लागतील असे सांगितले. त्यासाठी १२५० रुपयांची मागणी केली. सोमवारी पैसे घेऊन या आणि उतारा घेऊन जा असे सांगण्यात आले. यामुळे वैतागलेल्या देवरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. या विभागाच्या पथकाने सोमवारी सापळा रचला. लाचेची रक्कम स्वीकारताना शिंपीला पकडण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिंपीच्या उत्कर्ष कॉलनीतील टोलेजंग बंगल्याची तपासणी हाती घेतली. यापूर्वी शिंपीला दोन वेळा रंगेहाथ लाच स्वीकारताना पकडण्यात आले आहे. या कारवाईमुळे त्याने लाच स्वीकारण्याची ‘हॅट्ट्रिक’ केल्याचे स्पष्ट झाले आहे.