वाहतूक पोलिसांचा ‘एल टेम्प’ हा इंग्रजीत असलेला अर्ज आता लवकरच मराठीतूनही मिळणार आहे. याबाबत मराठी भाषा विभागाने संबंधितांना सूचना केली आहे. हा अर्ज मराठीतूनही मिळावा म्हणून गोरेगाव येथील जागरुक नागरिक उदय चितळे यांनी गेल्या काही महिन्यांपासून पाठपुरावा सुरु ठेवला होता. त्याला अखेर यश मिळाले आहे.
वाहतूक पोलिसांनी वाहन चालकाला एखाद्या गुन्ह्याबाबत रस्त्यात अडवले की पुढील कारवाई संदर्भात त्या व्यक्तीस देण्यात येणाऱ्या पोचपावतीचा नमूना (एल टेम्प) हा इंग्रजीत असतो. हा नमूना मराठी भाषेत असावा, अशी विनंती चितळे यांनी केली होती. पोलीस सहआयुक्त (वरळी)यांच्याकडे चितळे यांनी या विषयाबाबत सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. गृह विभागालाही ‘माहिती अधिकार’ कायद्याच्या अंतर्गत चितळे यांनी अर्ज सादर केला होता. मराठी भाषा विभागाने याची दखल घेऊन गृह विभागाच्या प्रधान सचिवांना यात लक्ष घालून आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
१९६४ अन्वये मराठी भाषेचा राजभाषा म्हणून स्वीकार केला आहे. या विभागाकडून शासन व्यवहारात मराठीचा वापर करण्याबाबत वारंवार सांगण्यात आले आहे. अर्जदाराने केलेली मागणी हा दैनंदिन कामकाजाचा भाग आहे. सदर नमुने हे राजभाषेत देणे आवश्यक आहे. तरी आवश्यक ती कार्यवाही तातडीने केली जावी, असे पत्र गृह विभागाच्या प्रधान सचिवाना कक्ष अधिकारी लिना धुरु यांनी पाठविले आहे.