News Flash

विधिसभेतील सदस्यांच्या शाब्दिक चकमकींमुळे कुलगुरूंचा सभात्याग

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आज पार पडलेल्या विधिसभेत सदस्यांची आपसामधील शाब्दिक चकमक विधिसभा अध्यक्षांच्या सभात्यागाला कारणीभूत ठरली.

| December 3, 2013 07:45 am

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आज पार पडलेल्या विधिसभेत सदस्यांची आपसामधील शाब्दिक चकमक विधिसभा अध्यक्षांच्या सभात्यागाला कारणीभूत ठरली.
विधिसभा सदस्य समीर केने यांनी प्रश्न विचारावा आणि त्यावर शांतपणे चर्चा होऊन त्यांच्यासह सभागृहाचे समाधान व्हावे, असे गेल्या १६-१७ विधिसभांमध्ये कधीच घडले नाही. केने यांनी चंद्रपूरच्या गुरुनानक महाविद्यालयातील पैशाची अफरातफर असो, विद्यापीठाचे माजी अधिवक्ता अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी यांचे प्रकरण असो की, गेल्या दोन विधिसभांमध्ये सारखा चर्चेस असलेला विद्यापीठ प्रशासनाला देण्यात येणाऱ्या गाडय़ांचा खाजगी वापर असो, हे प्रत्येक प्रश्न विधिसभेत विशेषत्वाने गाजले. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना दिल्या गेलेल्या वाहनांचा वापर कार्यालयीन कामांव्यतिरिक्त खाजगी कामासाठी होतो, असा केने यांच्या बोलण्याचा सूर होता. अधिकाऱ्यांच्या गाडय़ा रात्री १२ वाजता न्यायालयाजवळ, मुलांना शाळेत घेऊन जाताना दिसतात कशा, असा त्यांच्या प्रश्नाचा रोख होता आणि त्यासंबंधीचे लॉगबुक गेल्या विधिसभेत विद्यापीठाकडे मागितले होते. त्यासंबंधी काय काय कार्यवाही झाली, असा प्रश्न केने यांनी विचारला. त्यांच्याबरोबरच सदस्य महेंद्र निंबार्ते यांनी कोणत्या अधिकाऱ्याला गाडी मागितली आणि कोणी देण्यास नकार दिला, याची माहिती मागितली. यासंदर्भात जेवणाच्या अगोदरही चर्चा चालली आणि नंतरही विद्यापीठ प्रशासनाकडून काहीच उत्तर येत नसल्याचे लक्षात आल्याने ज्येष्ठ सदस्य डॉ. डी.के. अग्रवाल यांनी प्रशासनाची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आणि केने व निंबार्ते वाहनांचा विषय व्यक्तिगत घेत असल्याचा आरोप केला. अ‍ॅड. अभिजित वंजारी त्यांनीही डॉ. अग्रवाल यांच्या सुरात सूर मिळवला. त्यामुळे प्रशासनाचे समर्थन करणारे आणि विरोध करणारे, असे दोन गट पडून विधिसभेत काही वेळ होणारा आरडाओरड पाहून विधिसभा अध्यक्ष डॉ. सपकाळ यांनी सभात्याग केला.
मार्चमधील विधिसभेत समीर केने यांनी प्रश्न विचारला होता. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांमध्ये प्र-कुलगुरू, कुलसचिव, वित्त व लेखाधिकारी, परीक्षा नियंत्रक, बीसीयुडी संचालक, उपकुलसचिव आदी बरेच अधिकारी येतात. सर्वाच्याच वाहनांची माहिती केने यांना देण्यात आली. त्यांनी एका कागदावरील तपशील वाचायला आणि त्यावर प्रश्न विचारायला सुरुवात केली. योगायोगाने ती माहिती पूरण मेश्राम यांच्या गाडीची होती. त्यातून पूरण मेश्रामांचा तोल गेला आणि त्यांना आवरता आवरता इतर अधिकाऱ्यांना नाकी नऊ आले. एरवी विद्यापीठाच्या जवळपास सर्वच विभागात काम करून चुकलेले पूरण मेश्राम उत्कृष्ट प्रशासनाबद्दल नावाजले जातात. मात्र, विधिसभेतील चर्चेच्या वेळी त्यांचा तोल गेल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. ते म्हणाले, अशा रितीने जाणीवपूर्वक एखाद्या दलित अधिकाऱ्याला लक्ष्य केले जाते. विद्यापीठाच्या कामानिमित्तच वाहन वापरले जाते. मात्र, कुणाला आक्षेप असेल तर मी वाहन परत करील. गरज पडल्यास पदाचा राजीनामा देईल. वाहनांवरील चर्चा बाजूला राहून पूरण मेश्राम यांच्या तोलजावू भूमिकेचे उपस्थित सर्वजण प्रत्यक्षदर्शी ठरले. आजच्या विधिसभेतही हा प्रश्न प्रलंबित ठेवला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2013 7:45 am

Web Title: vice chancellor of sacrifices house
टॅग : Nagpur,Vidarbh
Next Stories
1 परिवर्तनाचा संघर्ष सनातनच आहे – डॉ. सबनीस
2 ‘जादूटोणा विधेयकाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी आवाज उठवू’
3 अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी – अनिल देशमुख
Just Now!
X