महापालिकेच्या पदाधिकारी असलेल्या उपमहापौर गीतांजली काळे यांनाच शहराच्या विकासकामाची माहिती बांधकाम विभागातून मिळवण्यासाठी एखाद्या सामान्य कार्यकर्त्यांसारखे झगडावे लागत आहे. त्यामुळे वैतागून असे असेल तर या पदावर बसून माझा उपयोग काय याचा खुलासा करावा असे उपमहापौरांनी थेट मनपा आयुक्तांनाच कळवले आहे.
मनपाच्या वतीने सावेडीतील गंगा उद्यानाजवळ फूडपार्क करण्यात येणार आहे. त्याची प्राथमिक तयारी सुरू आहे. या कामाबाबत स्थानिक नगरसेवक संगीता खरमाळे यांची काही तक्रार आहे. त्यांनी ती उपमहापौर श्रीमती काळे यांच्याकडे केली. काळे यांनी बांधकाम विभागाकडे याबाबत माहिती मागितली. त्याला पंधरा दिवस झाले तरीही बांधकाम विभागाने माहिती तर लांबच राहिली साधे त्यांना त्यांच्या पत्राची दखल घेतल्याचे देखील कळवले नाही.
त्यामुळे श्रीमती काळे यांनी पंधरा दिवसांनी त्यांना स्मरणपत्र पाठवले. त्याचीही बरेच दिवस दखल घेतली गेली नाही. म्हणून त्यांनी थेट बांधकाम विभागात चौकशी केली. त्यावेळी त्यांनी तुम्ही मागवलेल्या माहितीची फाईल तयार करून ती उपायुक्त व आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठवली आहे, त्यांची मंजुरी मिळाल्यानंतरच माहिती देण्यात येईल असे सांगण्यात आले. त्याहीपेक्षा धक्कादायक बाब म्हणजे यापुढे आपण माहितीच्या अधिकारात माहिती मागवत जा असा सल्लाही उपमहापौरांना देण्यात आला.
संतापलेल्या उपमहापौर काळे यांनी मग थेट आयुक्त विजय कुलकर्णी यांनाच याबाबत पत्र पाठवले आहे. उपमहापौरांना जर माहितीच्या अधिकाराखाली शहराच्या विकास कामाची माहिती मागवावी लागत असले तर मग या पदाचा उपयोग काय आहे ते तरी समजावून सांगावे असे त्यांना त्यात म्हटले आहे. जाणीवपुर्वक माहिती दडवून ठेवण्यात येत आहे. बांधकाम विभागातील कारकूनाला
काही कळत नसेल पण आपल्यापुढे कशाची फाईल आली आहे हे शहर अभियंता, उपायुक्तांनाही कळत नाही का असे विचारून त्यांनी याबाबत त्वरीत खुलासा करावा नाहीतर वेगळा विचार करू असा इशाराही आयुक्तांना दिला आहे.