नागरिकांनी दाखवली सजगता
नागरिकांच्या सजगतेमुळे अयोग्य पद्धतीने सुरू असलेले गटारीचे बांधकाम थांबले. उपमहापौर गीतांजली काळे, तसेच सभापती किरण उनवणे यांनी कामाच्या ठिकाणची पाहणी करून नागरिकांच्या म्हणण्याप्रमाणे काम करण्याचा आदेश ठेकेदाराला दिला.
सर्जेपुरा येथील दक्षिणमुखी मारूती मंदिरासमोर गटारीचे काम सुरू आहे. मंदिराचे पुजारी प्रविण परदेशी, तसेच भाविक लक्ष्मीकांत हेडा यांनी कामाची पाहणी केली असता त्यांना ते चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचे आढळले. ते तसेच झाले तर पावसाळ्यात पावसाचे पाणी बरोबर मंदिराच्या समोर साचून भाविकांना मंदिरात येणे-जाणे अवघड झाले असते. ठेकेदाराला सांगूनही तो ऐकत नसल्याने हेडा, तसेच परदेशी यांनी उपमहापौर श्रीमती काळे यांची भेट घेतली व त्यांच्याकडे तक्रार केली.
श्रीमती काळे यांनी महिला बाल कल्याण समितीच्या सभापती किरण उनवणे, तसेच मनपाचे अभियंता आर.जी. सातंपुते, पारखे, स्वच्छता निरिक्षक भोर, किशोर कानडे यांच्या समवेत काम सुरू असलेल्या ठिकाणी भेट दिली व पाहणी केली. त्यावेळी नागरिकांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे त्यांना आढळले. त्यांनी लगेचच ठेकेदाराला योग्य पद्धतीने व नंतर मंदिरात जाण्यायेण्यास काही अडचण येणार नाही, असे काम करण्याचे आदेश दिले.