सोयाबीनचे पीक नाही आणि कापसाला भाव नाही, अशा अस्मानी आणि सुलतानी संकटात विदर्भातील शेतकरी सापडला आहे. यावर्षी उशिरा आलेल्या पावसामुळे व सोयाबीनच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले आहे.  सोयाबीनचे एकरी ८ ते १० क्विंटल होणारे उत्पादन शेतकऱ्याला यंदा एक ते दोन क्विंटल झाले आहे. शेतकऱ्याला सोयाबीन सोंगणे परवडत नाही. लावलेला एकरी खर्चही भरून निघत नाही म्हणून २० टक्के शेतकऱ्यांनी उभे पीक वखरून टाकले. सोयाबीनच्या पिकावर शेतकऱ्यांची दिवाळी साजरी होत असते. यंदा ती झालीच नाही. मागील वर्षी ४५०० रुपये क्विंटलपर्यंतचे भाव यंदा २५०० ते ३००० रुपयांच्या घरातच आहेत.
पावसामुळे कापसाची उशिरा पेरणी झाली आणि लवकर पाऊस गेल्याने सहा ते सात क्विंटल प्रती एकर होणारे कापसाचे उत्पादन यंदा अध्र्यावर आले आहे. गेल्या वर्षी कापसाचे भाव ५५०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेले होते. यावर्षी तर आज बाजारात ३५०० ते ४००० रुपये प्रति क्विंटल पर्यंत आहे. केंद्र सरकारने यावर्षी ४००० रुपये वर फक्त ५० रुपये वाढवून ४०५० रुपये प्रतिक्विंटल आधारभूत किंमत जाहीर केली आहे. उत्पादन खर्च ६००० रुपयांच्या वर असताना आधारभूत किंमत फक्त ४०५० रुपये निश्चित करण्यात आली. दुसरीकडे यंदा कापसाला बाजारात आधारभूत किमतीपेक्षा कमी भाव आहे. यामुळे कापूस उत्पादकाला उत्पादनही कमी येणार असून भावही कमी मिळणार. अशा दुसरी अडचणीत शेतकरी सापडला आहे. उशिरा पावसामुळे विदर्भातील संत्र्याला मृग बहार फारच कमी प्रमाणात आहे. तसेच आंबिया बहरची उष्ण हवामानाने गळ झाली. यामुळे संत्रा उत्पादकही मोठय़ा अडचणीत आला आहे.
शेतीमालाला रास्त भाव मिळावा -नेवले
केंद्र व राज्य सरकारने मिळून शेतकऱ्यांना त्वरित २५ हजार रुपये हेक्टरी व संत्रा उत्पादकांना हेक्टरी ६५ हजार रुपये मदत द्यावी, संपूर्ण कर्जासह विजेच्या बिलातूनही शेतकऱ्यांना मुक्त करून त्याचा व्यवसाय तोटय़ात येऊ नये. यासाठी शेतीमालाला रास्त भाव मिळण्याचे धोरण नवीन सरकारला आखावे लागले, अशी मागणी शेतकरी संघटनेचे माजी प्रांताध्यक्ष राम नेवले यांनी केली.