केंद्रात आणि राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर देशाचे केंद्रस्थान असलेल्या दिल्ली विधानसभा काबीज करण्यासाठी विदर्भातून भाजपचे अनेक लोकप्रतिनिधी आणि काही प्रमुख पदाधिकारी दिल्लीला जाणार आहे. त्यासंदर्भात प्रदेश भाजपने काही लोकप्रतिनिधी पदाधिकाऱ्यांना प्रचारासाठी दिल्लीला जाण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकाची रणधुमाळी जोमात सुरू झाली असताना भाजपची प्रचार यंत्रणा कामाला लागली आहे. गेल्यावर्षी आम आदमी पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या असून भाजप दुसऱ्या स्थानावर होते. आम आदमी पक्षाने काँग्रेसच्या सहकार्याने सरकार स्थापन केले.
मात्र, ते फार काळ टिकू शकले नाही आणि राष्ट्रपती राजवट लागली. मधल्या काळात लोकसभा आणि विविध राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाल्यानंतर यावेळी कुठल्याही परिस्थितीत दिल्ली विधानसभा काबीज करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. निवडणुकीसाठी राज्यातून अनेक लोकप्रतिनिधी प्रचारासाठी जाणार असून त्यात विदर्भातील काही आमदारांचा सहभाग राहणार आहे. दिल्लीमध्ये हिंदी भाषिक वर्ग मोठय़ा प्रमाणात असला तरी मराठी भाषिक मोठय़ा प्रमाणात आहे. हा वर्ग भाजपकडे वळावा यासाठी राज्यातील काही मराठी भाषिक आमदारांना प्रचारासाठी दिल्लीला जाण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. यापूर्वी झारखंड, हरियाणामध्ये झालेल्या निवडणुकीसाठी राज्यातील अनेक नेते गेले असताना दिल्ली काबीज करण्यासाठी भाजपचे नेते सज्ज झाले आहे. या संदर्भात शहर अध्यक्ष कृष्णा खोपडे यांनी सांगितले, दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी विदर्भातून काही आमदार आणि पदाधिकारी जाणार आहे. मात्र, कोण जाणार याबाबत प्रदेश भाजपकडून सांगण्यात आले
नाही. जसे आदेश येतील त्याप्रमाणे विदर्भातून पदाधिकारी आणि आमदार जाणार आहे.
विदर्भातून २२ ते २३ लोक पुढच्या आठवडय़ात दिल्लीला जाणार असून त्यात काही लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. देश्भरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव आहे. दिल्लीत भाजपची सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.