News Flash

शेतकरी विधवांच्या घरी दिवाळीतही अंधार

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संपूर्ण देशात दिवाळी सण आनंदात साजरा होत असताना यवतमाळ जिल्ह्य़ातील शेकडो शेतकरी

| November 6, 2013 08:27 am

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संपूर्ण देशात दिवाळी सण आनंदात साजरा होत असताना यवतमाळ जिल्ह्य़ातील शेकडो शेतकरी विधवांनी मागण्यांसाठी पांढरकवडा येथे उपोषण सत्याग्रह करून सर्वाचे लक्ष वेधले. सरकारने कापसाचा हमीभाव ६ हजार रुपये तर सोयबानीचा हमीभाव ५ हजार रुपये क्विंटल करावा, अतिवृष्टीग्रस्त सर्व शेतक ऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये मदत द्यावी, खरीप हंगामाचे थकित कर्ज माफ करावे व नवीन पीक कर्ज द्यावे या मागण्यांसाठी यवतमाळ जिल्ह्य़ातील शेकडो शेतकरी विधवांनी रविवारी एक दिवसाचे उपोषण सत्याग्रह ‘काळी दिवाळी’ आंदोलन केले.
विदर्भात गेल्या पाच वर्षांत नऊ हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून अतिवृष्टीमुळे सर्व शेतकरी कुटुंबे उपासमारीला तोंड देत आहेत. विदर्भात ३ लाखांवर कर्जबाजारी शेतकरी नैराश्यात गेल्यामुळे आत्महत्या करण्याच्या उंबरठय़ावर आहेत. अशा शेतकऱ्यांचा जीवन जगण्याचा अधिकार सुरक्षित करा, अशी मागणी शेतकरी विधवांनी केली. या आंदोलनाचे नेतृत्व रेखा गुरनुले, रमा ठमके, माया वैद्य, चंद्रकला मेश्राम, वंदना शेंडे, पुष्पा प्रधान, नंदा भंडारे, शिला मांडवगडे, भारती पवार, अपर्णा मालीकर, संगीता पंचनेनीवार, रेखा चहारे, उमा जिड्डेवार, ज्योती जिड्डेवार, बेबी बैस आदींनी केले.
पणन महासंघाने कापसाची खरेदी आठवडाभरात सुरू केली नाही तर संचालकांच्या घरासमोर शेतकरी विधवा बांगडय़ांचा अहेर करतील, असा इशारा भारती पवार यांनी यावेळी दिला.
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी हे आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी व्यक्त केला. कापूस व सोयाबीनची खरेदी हमीभावापेक्षा कमी भावाने सुरू असताना सरकार झोपलेले आहे. शेतकऱ्यांना मदतीची घोषणा हवेत विरली आहे.  केवळ ८० ते १०० रुपयांचे धनादेश देऊन सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. अशा परिस्थितीत शेतक ऱ्यांनी हातात मशाल घेऊन न्याय मिळवून घ्यावा, असे आवाहन विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते तिवारी यांनी केले आहे.
या आंदोलनात सुरेश बोलेनवार, अंकित नैताम, नितीन कांबळे, नंदू जयस्वाल, मनोज मेश्राम, संतोष नैताम, भीमराव नैताम, तुकाराम चव्हाण आदी सहभागी झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2013 8:27 am

Web Title: vidarbha farmers widow spend diwali nights in darkness
Next Stories
1 सोनिया २० नोव्हेंबरला नागपुरात
2 सिकलसेलग्रस्तांसाठीच्या शासकीय घोषणा पोकळ
3 समस्त नागपूरकरांवर किल्ल्यांची मोहिनी
Just Now!
X