निवडणुकीआधी स्वतंत्र्य विदर्भ राज्याबाबत बोलणाऱ्यांनी सत्तेची चव चाखताच भाषा बदल्याने संतापलेले वैदर्भीय महाराष्ट्र दिनी आक्रमक झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुतळ्यांचे त्यांनी दहन करून विदर्भातील सर्व जिल्ह्य़ांत विदर्भाचा ध्वज फडकविला.
‘विदर्भ कनेक्ट’ या संस्थेच्या वतीने विष्णुजी की रसोईत झालेल्या नागपुरातील मुख्य सोहळ्यात  विदर्भाचा ध्वज फडकविण्यात आला. यावेळी जुने विदर्भवादी ज्येष्ठ समाजसेवक उमेश चौबे, माजी कुलगुरू हरिभाऊ केदार हे प्रामुख्याने उपस्थित होते. त्यानंतर तेथून इतवारीतील शहीद चौकातील विदर्भ चंडिकापर्यंत दुचाकी मिरवणूक काढण्यात आली. तेथून परत व्हरायटी चौकात ही मिरवणूक आली आणि विदर्भ जन आंदोलन समितीतर्फे आयोजित निषेध आंदोलनाला नैतिक समर्थन दिले. विदर्भ राज्य आंदोलन समितीने आज व्हरायटी चौकात पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पुतळे आणले. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद झाला. यात  पुतळा तुटला आणि कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी रास्तो रोका आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी ४० ते ५० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. तत्पूर्वी समितीच्या मुख्य कार्यालयासमोर या तिन्ही नेत्यांच्या पुतळ्यांचे दहन करण्यात आले. शिवाय समितीच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शहीद चौक आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासापासून काही पावलावर असलेल्या गिरीपेठेत पुतळे जाळले. या आंदोलनात राम नेवले, प्रवीर चक्रवर्ती, अरुण केदार, दिलीप नरवाडीया, अ‍ॅड. नंदा पराते, सुनील लांजेवार, दिलीप कोहळे, अरविंद भोसले, अशोक पाटील आणि आदमने तसेच बऱ्याच विदर्भवादी सहभागी झाले होते.  
विरोधी पक्षात फडणवीस आणि गडकरी यांनी स्वतंत्र विदर्भाबाबत ठोस आश्वासने दिली होती. सत्ता आल्यानंतर वैदर्भीय जनतेचा विश्वासघात केला.
भाजपच्या ठरावानुसार आणि जाहीरनाम्यानुसार पंतप्रधान मोदी यांनीदेखील याबाबत निर्णय घेतला नाही. त्यामुळे तिन्ही नेत्यांचा एक पुतळा आणि त्याला तीन तोंडे लावून त्यांचे दहन करण्यात आले. हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला आहे. भारिप बहुजन महासंघाच्या वतीने देखील स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी संविधान चौकात निदर्शने करण्यात आली. भाजपने निवडणूक जाहीरनाम्यात दिलेली आश्वासन पाळत नसल्याबद्दल भाजपचा निषेध करण्यात आला. दरम्यान, विदर्भात स्वतंत्र विदर्भ राज्याचा आवाज अधिक बुलंद करीत विदर्भ ध्वजारोहण कार्यक्रम आणि १ मे विदर्भाचा काळा दिवस म्हणून ‘व्ही-कनेट’ या संघटनेने पाळला. यावेळी विदर्भातील अकरा जिल्ह्य़ात एकाच वेळी १२ ठिकाणी विदर्भाचा ध्वज फडविण्याचा विक्रम करण्यात आला.

तृतीय पंथीयांचे आगळे आंदोलन
स्वतंत्र विदर्भ राज्य झाला पाहिजे, असे म्हणत तृतीयपंथीयांनी देखील आंदोलन केले. काही तृतीय पंथीयांनी वाहनाच्या समोर झोपून महाराष्ट्र दिनाचा निषेध नोंदविला.
ध्वजारोहणाचे गुगल मॅपिंग
विदर्भातील अकराही जिल्ह्य़ांत विदर्भ राज्य ध्वजारोहण कार्यक्रम कुठे-कुठे आयोजित करण्यात आला. याचे ‘विदर्भ कनेट’च्या वतीने गुगल मॅपिंगद्वारे नोंद घेण्यात आली. बुलढाणा जिल्ह्य़ातील सिंदखेडराजा येथे अ‍ॅड. श्रीहरी अणे यांच्या प्रमुख उपस्थितीत विदर्भाचा ध्वज फडकविण्यात आला. याशिवाय चंद्रपुरात जनता महाविद्यालय, गडचिरोलीत मातोश्री विद्यालयात, गोंदियात समर्थ महाविद्यालय, भंडारा येथे सहकारनगरात, यवतमाळ येथे बापूजी अणे चौकात ध्वजारोहण करण्यात आले. नागपूरसह अमरावती, अकोला, वर्धा, वाशीम जिल्ह्य़ात देखील विदर्भाचा ध्वज फडविण्यात आला.