News Flash

विदर्भातील रुग्णालयांची कामे मार्चपूर्वी करणार

विदर्भातील मेडिकल आणि मेयोसह विविध शासकीय रुग्णालयाच्या विकासासंबंधी असलेली प्रलंबित कामे ही मार्चपूर्वी पूर्ण करणार असून त्यासाठी काही

| January 8, 2014 10:40 am

विदर्भातील रुग्णालयांची कामे मार्चपूर्वी करणार

विदर्भातील मेडिकल आणि मेयोसह विविध शासकीय रुग्णालयाच्या विकासासंबंधी असलेली प्रलंबित कामे ही मार्चपूर्वी पूर्ण करणार असून त्यासाठी काही योजनांच्या निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. निवडणुकीच्या तोंडावर डॉ. गावित यांनी विदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विकास कामासंबंधी सर्व अधिष्ठात्यांची बैठक घेऊन पुन्हा केवळ देखावा निर्माण केला असल्याची चर्चा मेडिकल परिसरात होती.
विदर्भातील विविध जिल्ह्य़ातील शासकीय महाविद्यालयांच्या विकास कामांचा आढावा घेण्यासंदर्भात डॉ. विजयकुमार गावित यांनी सर्व अधिष्ठाता आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीनंतर बोलताना डॉ. गावित म्हणाले, वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तरच्या जागा वाढल्यानंतर त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून निधी मिळाला होता. त्या निधीचा उपयोग कुठे केला, याची माहिती यावेळी घेण्यात आली. केंद्र शासनाकडून मेडिकल आणि मेयोच्या विकासासाठी निधी आला, मात्र काही योजनांच्या निविदा काढण्यात आल्या नाहीत. त्यामुळे काम रखडले आहे. मार्चपूर्वी ही सर्व कामे पूर्ण करण्याच्या उद्देशाने प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. त्या संदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारकडे लवकर पाठवावे, असे आदेश देण्यात आले आहेत. काही योजनांना प्रशासकीय मान्यता नसल्यामुळे त्यांची कामे अर्धवट स्थितीत आहेत, ती कामे मार्चपूर्वी करण्यात येणार आहेत.
रुग्णालयांमध्ये कर्मचाऱ्यांची आणि डॉक्टरांची ५३० ते ६०० पदे रिक्त असून ती भरण्यासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या पदांना मान्यता मिळाली की मार्चपूर्वी ती भरण्यात येतील. पदे भरताना काही अधिकाऱ्यांना बढती दिली जाणार आहे. सफाई कर्मचाऱ्यांची पदे भरण्यासंदर्भात विचारले असता त्याचे आऊटसोर्सिग करण्यात येणार असून त्या संबंधीचे काम सुरू झाले आहे. सुरक्षा रक्षकांची पदे भरण्यात येणार असून त्याचे काम खासगी संस्थेला देण्यात येणार आहे. राज्यात विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत ज्येष्ठ निवासी डॉक्टरांची ४४२ रिक्त आहेत. त्यात नागपूरच्या शासकीय महाविद्यालयात ६९ आणि मेयो रुग्णालयातील ३९ पदे आहेत. क्लिनिकलची पदे ही वेगळी आहेत. ही सर्व पदे भरण्यासंदर्भात चर्चा झाली असून त्या संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल.
कॅन्सर हॉस्पिटलच्या संदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकाला पाठविला होता. त्यात काही त्रुटी असल्याने केंद्र सरकारने तो परत पाठविला आहे. त्यामुळे नव्या स्वरूपात तो पुन्हा पाठविण्यात येणार आहे. विदर्भाकडे दुर्लक्ष केले जात नसून ज्या योजना गेल्या दोन ते तीन वर्षांत राबविण्यात आल्या आहेत. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राला जास्त निधी आणि विदर्भाला कमी निधी असा भेदभाव करण्यात आलेला नाही. मेडिकलमध्ये औषधांचा तुटवडा असण्याची गरज नाही. औषध कंपन्याची सर्व देयके देण्यात आली असल्याचे डॉ. गावित यांनी सांगितले.
मेडिकल प्रशासनामुळे डॉ. गावित अनभिज्ञ
डॉ. विजयकुमार गावित यांनी मेडिकलच्या विकास कामांचा आढावा घेत असताना त्यांना अनेक कामांची आणि योजनांची माहिती नसल्याचे लक्षात आले. मेडिकमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून ट्रामा केअर सेंटरचे काम सुरू असताना ते कुठे सुरू आहे, अशी विचारणा केली. मेडिकलमध्ये सुरू असलेल्या अनेक योजनांची गावित यांना मेडिकल प्रशानाकडून माहिती देण्यात येत नसल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. औषधांची देयके देण्यात आली असल्याचे गावित यांनी प्रसार माध्यमांना सांगितले असता प्रशासनाने मात्र अजून अनेक देयके शासनाकडे प्रलंबित असल्याचे सांगितले. त्यामुळे मेडिकल प्रशासन आणि वैद्यकीय विभाग यांच्यामध्ये कुठलाच समन्वय दिसून आला नाही. अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनीसुद्धा डॉ. गावित यांना अनेक अर्धवट स्थितीत असलेल्या योजनांची माहिती दिली नसल्यामुळे डॉ. गावित यांची प्रसार माध्यमांसमोर बोलताना अडचण झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2014 10:40 am

Web Title: vidarbha hospitals work before march
Next Stories
1 महागाईने सामान्यांचा जीव ‘तीळ-तीळ’ तुटतोय!
2 आंदोलने ‘हायजॅक’ करून कामगारांना ‘आप’कडे वळविण्याचा प्रयत्न
3 स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीसाठी चंद्रपूर व यवतमाळमध्येही मतदान घेणार
Just Now!
X