रंगभूमी परीक्षण मंडळाची ३४ सदस्यांची यादी राज्याच्या सांस्कृतिक विभागाने जाहीर केली. तीत विदर्भातील सांस्कृतिक क्षेत्रातील कलावंत व नाटय़लेखकाला डावलण्यात आले. मुख्यमंत्री नागपूरचे असताना आणि विदर्भाचे सांस्कृतिक वैभव बघता एकाही सदस्याची या मंडळावर नियुक्ती न होणे म्हणजे विदर्भाची नाचक्की असल्याची प्रतिक्रिया सांस्कृतिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाच्या प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या विदर्भातील भाजपच्या सांस्कृतिक आघाडीमधील एकाही सदस्याला स्थान देण्यात आले नाही.
नाटकाची नवीन संहिता आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्याचे काम रंगभूमी परीनिरीक्षण मंडळाकडे असल्यामुळे या मंडळावर साधारणत: नाटय़ व चित्रपट कलावंत, लेखक, दिग्दर्शक, निर्माता यांची नियुक्ती केली जाते. गेल्या काही वषार्ंत सामाजिक आणि राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या कार्यकर्त्यांना स्थान दिले जात असल्याचे समोर आले आहे.
राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर आघाडी सरकारच्या काळातील समिती बरखास्त करण्यात आली. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी नवीन ३४ सदस्यांची समिती जाहीर केली आहे. या समितीमध्ये प्रत्येक विभागाला प्रतिनिधित्व देण्याची गरज असताना यावेळी विदर्भाला डावलून मुंबई, पुणे, नाशिक, रत्नागिरी आणि साताराला प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. ज्येष्ठ चित्रपट कलावंत आणि दिग्दर्शक अरुण नलावडे यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीमध्ये मुंबईतून २१, पुण्यातील ९, नाशिकचे २ आणि रत्नागिरी आणि सातारामधील प्रत्येकी एक अशी ३४ सदस्यांची नियुक्ती केली आहे. यापूर्वी आघाडी सरकार असताना अजय गंपावार, सतीश पावडे आणि जॉनी मेश्राम हे समितीचे सदस्य होते. अकोल्यातील ज्येष्ठ नाटककार राम जाधव समितीचे अध्यक्ष होते. विदर्भातील नवोदित लेखकांच्या नाटय़ संहितांना किंवा प्रयोगाला परवानगी घेण्यासाठी विदर्भातून किमान ३ सदस्यांची नियुक्ती केली जाते. मात्र, यावेळी एकाही कलावंताला स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे आता कलावंतांना परवानगीसाठी मुंबईला जावे लागेल का? असा प्रश्न अनेक कलावंतांनी उपस्थित केला आहे.
विदर्भातील सांस्कृतिक क्षेत्र वाढावे या उद्देशाने भाजपने राज्य पातळीवर सांस्कृतिक आघाडी तयार केल्यानंतर अनेक कलावंत या आघाडीशी जुळले गेले. राज्यात आणि देशात झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या काळात या आघाडीच्या माध्यमातून पक्षातील कलावंत असलेल्या कार्यकर्त्यांंनी दिवस रात्र पथनाटय़ आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून पक्षाचा प्रचार केला. त्यात पक्षाला मोठे यश मिळालेले असताना पक्षाच्या कार्यकत्यार्ंना डावलण्यात आले आहे. विदर्भावर करण्यात आलेल्या या अन्यायामुळे अनेक कलावंत आणि भाजप कार्यकत्यार्ंनी नाराजी व्यक्त करुन मुंबईला झुकते माप का असा प्रश्न उपस्थित केला. तीन वषार्ंसाठी ही नवी समिती राहणार असल्यामुळे विदर्भातील नवोदित कलावंतांना मुंबई-पुण्याला जाण्याशिवाय पर्याय नाही.

रंगभूमी परीक्षण मंडळ समिती
अरुण नलावडे, प्रसाद कांबळी, मनोहर जोशी, विनिती पिंपळघरे, दिग्पाल लांजेकर, शिवराज कुळकर्णी, मानसी मागीकर, अ‍ॅड. आनंद देशपांडे, प्रशांत ठोसर, सुरेश गायधनी, अशोक समेळ, अमित बैचे, पंकज मीठभाकरे, गिरीश भुतक, सतीश शेंडे, फैय्याज शेख, पुरुषोत्तम लेले, अश्विनी गिरी, सुरेश खरे, अलि सदानी, विवेक गरूड, डॉ. दयानंद नाईक, अमित मराठे, डॉ. कमलेश महाजन, नीळकंठ वाघमारे, अवधूत सप्रे, विवेक आपटे, वर्षां अदलजा, स्मिता शरद भोगले, अजय खडपकर, मिलिंद टिकेकर, पनंद जोशी, प्रा. विजयकुमार तरणेकर, दक्षायनी बोपार्डीकर.