नव महाराष्ट्र क्रीडा मंडळातर्फे १४ नोव्हेंबरपासून ४८ व्या विदर्भ अजिंक्यपद पुरुष व महिला खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मंडळाचे सचिव प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली. नागपूर जिल्हा खो खो संघटनेच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होणार आहे.
१४ ते १६ नोव्हेंबरदरम्यान चिटणीस पार्कवर होणाऱ्या या स्पर्धेत पुरुष विभागात १० तर महिला विभागात नऊ जिल्ह्य़ातील संघ सहभागी होणार आहेत. खेळाडूंची निवास व भोजन व्यवस्था अग्रेसन भवनमध्ये करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना सव्वा लाखाच्या जवळपास पारितोषिके दिली जाणार आहेत. शिवाय दोन्ही गटातील विजेत्यांना चषक आणि रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. गेल्यावर्षी वरोरामध्ये झालेल्या स्पर्धेत नागपूर पुरूष व महिला संघाने विजेतेपद मिळविले होते. या स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर बंगळुरू येथे १७ ते २१ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या वरिष्ठ राष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी विदर्भ संघाची निवड केली जाणार आहे. त्यासाठी निवड समिती सदस्य नागपुरात उपस्थित राहतील. सामने साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन सायंकाळी ५ वाजता महापौर प्रवीण दटके यांच्या हस्ते होईल. यावेळी माजी स्थायी समिती अध्यक्ष संदीप जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. १५ व १६ नोव्हेंबर रोजी सकाळ आणि सायंकाळ अशा दोन्ही सत्रात सामने होतील. १६ नोव्हेंबरला रात्री पुरस्कार वितरण समारंभ होईल. या स्पर्धेसोबतच सबज्युनियर मुला मुलींची जिल्हा पातळीवरील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यात काटोल संघासह एकूण आठ संघ सहभागी होतील. पत्रकार परिषदेला सुधीर निंबाळकर, शिरीष भगत, चारुलता नायगावकर, मनोज बालपांडे उपस्थित होते.