अकोल्यात पुढारी व लोकप्रतिनिधी यांना नालायक म्हणणारे मनसे आमदार शिशिर शिंदे यांच्या वक्तव्याबद्दल विदर्भातील लोकप्रतिनिधी व पुढाऱ्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. अकोल्यात विविध पक्षातील नेत्यांनी दुसऱ्याची रेष खोडण्यापूर्वी स्वतची रेष मोठी करण्याचा सल्ला मनसे आमदार शिशिर शिंदे यांना दिला. स्वतचे नेतृत्व सिध्द करण्यासाठी इतरांना नालायक ठरविणे चुकीचे असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तुकाराम बिडकर म्हणाले.
मी हसतो लोकांना, शेंबुड माझ्या नाकाला.. अशी परिस्थिती मनसे आमदार शिशिर शिंदे यांची असल्याची टीका माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तुकाराम बिडकर यांनी केली. मनसे आमदारांच्या मतदार संघातील सर्व प्रश्न सुटले का, असा प्रश्न करून त्यांनी ही टीका केली. मनसे आमदार पक्ष सोडून चालले. त्यांना पहिले आवारण्याची गरज आहे. स्वतचे नेतृत्व सिध्द करण्यासाठी इतरांना नालायक ठरविणे   चुकीचे    असल्याचे    ते    म्हणाले. विदर्भातील   नेत्यांनी  राज्य व देशात नेतृत्व केले आहे. त्यांचा हा अपमान आहे.
शिंदे यांचे विधान चुकीचे असून त्यांनी स्वतच्या मतदार संघात लक्ष घालावे, अशी मागणी बिडकर यांनी केली. विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या माध्यमातून मोठा विकास या भागात केल्याचा दावा बिडकरांनी केला. सगळ्याच पक्षातील विदर्भातील पुढारी व लोकप्रतिनिधी हे येथील समस्या सोडविण्यासाठी अग्रेसर आहेत. मनसेने जनाधार घ्यावा व विदर्भातील विकासाकडे लक्ष द्यावे, असा सल्ला त्यांनी दिला.
त्यांना विदर्भाचे ज्ञान किती -आ. पिंपळे
मनसे आमदार शिशिर शिंदे यांचे वक्तव्याने संपूर्ण विदर्भातील जनतेचा अपमान होत असल्याचे मत मूर्तिजापूर येथील भाजप आमदार हरिष पिंपळे यांनी व्यक्त केले. आम्हाला मनसेसारखा देखावा करता येत नाही. आम्ही प्रत्यक्षात काम करतो, असे खडे बोल आमदार पिंपळे यांनी सुनावले. शिशिर शिंदे विदर्भात किती वेळा आले, त्यांनी येथील किती कामांचा अभ्यास केला, त्यांना विदर्भाचे किती ज्ञान आहे, याची चाचपणी करण्याची गरज आहे. त्यांचे पुढाऱ्यांबद्दलचे वक्तव्य अत्यंत लांच्छनास्पद आहे, अशी टीका पिंपळे यांनी केली.
आम्ही विदर्भासाठी न्याय मागत आहोत. सरकार विदर्भाकडे लक्ष देत नाही म्हणूनच आमचा पक्ष स्वतंत्र विदर्भाची मागणी करत आहे. विदर्भ स्वतंत्र झाल्यास आम्ही सक्षमपणे चालविण्यास समर्थ असल्याचे मत त्यांनी मांडले. सरकारला मनसे अप्रत्यक्षपणे मदत करते त्याचे काय, असा प्रश्न पिंपळे यांनी विचारला. टोलटॅक्सचे आंदोलन करायचे आणि त्याचा फायदा कुणाला झाला, याची तपासणी मनसेच्या आमदारांनी पहिले करावी मगच येथील नेत्यांवर टीका करावी, असा सल्ला आमदार पिंपळे यांनी दिला.
वक्तव्य अर्धवट ज्ञानावर आधारित -आ. गावंडे
शिवसेना पश्चिम विदर्भात जनतेच्या समस्यांसाठी लढत आहे. शिवसेना नेते आमदार दिवाकर रावते यांच्या नेतृत्वाखाली निघालेली कापूस दिंडी असो की आधार दिंडी, या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम शिवसेना स्थानिक पातळीवर करत आहे, असे मत अकोट येथील शिवसेना आमदार संजय गावंडे यांनी व्यक्त केले.
मनसे आमदारांचे वक्तव्य अर्धवट ज्ञानावर आधारित असल्याची टीका त्यांनी केली. ग्रामीण व शहरी भागातील जनतेशी शिवसेनेची नाळ जुळली आहे. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेना तत्पर आहे. आमदार दिवाकर रावते यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा देशभर नेण्यात आला.
त्यांच्या आंदोलनामुळे विदर्भातील शेतकऱ्यांसाठी राज्य व केंद्र सरकारला पॅकेज द्यावे लागले. तेव्हा मनसे कुठे होती, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. विदर्भात विविध भागात नगरसेवकपद असलेले मनसेचे पदाधिकारी काय करतात? तसेच मनसेचे विदर्भातील पक्षाचे पदाधिकारी काय काम करतात, याकडे शिंदे  यांनी   लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. विदर्भाच्या    विकासात    काँग्रेस   व राष्ट्रवादीचा   अडसर असून त्यांच्याबद्दल ब्र सुध्दा मनसेचे  नेते का उच्चारत नाही, असा प्रश्न आमदार संजय गावंडे यांनी उपस्थित केला.
विदर्भाची पहाणी करून बोला -उपमहापौर सिद्दीकी
अपने गिरेबान मे झाक कर देखे.. असे म्हणत काँग्रेसचे अकोला महापालिकेतील उपमहापौर रफिक सिद्दीकी यांनी टीका केली. शिशिर शिंदे यांनी पहिले या भागाचा दौरा करावा व   येथील    विकासाची   पाहणी   करावी. केवळ   टीका   केल्याने    पक्ष  मोठा होत नाही.
जनतेच्या समस्यांची जाण असावी व ती सोडविण्यासाठी सत्ता असावी लागते, असा सल्ला त्यांनी दिला. राज्याचे मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वामुळे विदर्भाला पॅकेज मिळाले आहे. विदर्भाच्या सर्वागिण विकासासाठी काँग्रेसचे नेतृत्व सतत दक्ष असून विदर्भात उद्योग आणण्यासाठी स्वतंत्र प्रयत्न करण्यात काँग्रेस नेतृत्व अग्रेसर आहे.
विदर्भातील विकासाच्या चार गोष्टी पाहिल्यावर येथील पुढारी व लोकप्रतिनिधी काय काम करतात, याची जाणीव शिंदे यांना होईल, असाही सल्ला त्यांनी दिला.
टीका वैफल्यातून -जि.प.अध्यक्ष इंगळे
सामान्य जनतेची समस्या सोडविण्यासाठी विदर्भाचे पुढारी अग्रेसर आहे. आमदार शिंदे यांची टीका वैफल्यातून आल्याचे मत भारिप-बमसंच्या जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पाताई इंगळे यांनी व्यक्त केले.
विदर्भात सिंचनासाठी निधी देण्यात राज्य सरकार काटकसर करते त्यामुळे सिंचनाचे प्रकल्प पूर्ण होत नाही. याला येथील पुढाऱ्यांचा दोष नसून राज्य सरकारचे धोरण कारणीभूत आहे.
विदर्भाच्या पैशावर पश्चिम विदर्भाचा विकास होत असेल तर या प्रकरणात मनसे आमदारांनी राज्य सरकारला जाब विचारावा. येथील लोकप्रतिनिधींवर टीका करू नये, असे मत इंगळे यांनी व्यक्त केले.