विदर्भावर अन्याय होतो, असे सतत गळे काढून अन्यायाचा पाढा वाचणाऱ्या वैदर्भीय नेतृत्वाने केंद्र व राज्य शासनाने घोषित केलेले शैक्षणिक उपक्रम टिकवून ठेवण्यात कोणतीच धमक दाखवली नाही. विदर्भातील अनेक शैक्षणिक उपक्रम व प्रकल्प नागपुरात सुरू करण्यात अपयश आले आहे. केंद्र किंवा राज्य शासनाने घोषित केलेली महाविद्यालये किंवा संस्था इतर जिल्ह्य़ातील नेतृत्व पळवून नेते. मात्र, ते सारे नागपूरबाहेर जाऊ न देण्याचा खमकेपणा वैदर्भीय नेतृत्वाला दाखवता आलेला नाही.  
नागपूरच्याच नव्हे, तर संपूर्ण विदर्भातील शैक्षणिक वातावरणाला चालना देणाऱ्या अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय उपक्रमांची घोषणा गेल्या काही वर्षांमध्ये वेगवेगळ्या व्यासपीठांवरून करण्यात आली. एखादे दान पदरात पडल्यानंतर ते सिद्धीस नेण्यासाठी जी तोषिस सहन करण्याची दीघरेउद्योगी वृत्ती हवी, ती वैदर्भीय नेत्यांनी अपवादानेच दाखवली. नॅशनल लॉ स्कूल, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, मुलींसाठी शासकीय तंत्रनिकेतन, व्होकेशन विद्यापीठ, आयआयआयटी सारख्या संस्था अद्यापही सुरू होऊ शकलेल्या नाहीत. वास्तविक, नागपूर लॉ स्कूल नागपूरसाठीच घोषित करण्यात आले होते. मात्र, त्याविषयी मुंबई, औरंगाबाद की नागपूर, असे त्रांगडे निर्माण करून हा विषय अधांतरी ठेवण्यात पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी बाजी मारली. डॉ. नितीन राऊत यांच्या प्रयत्नाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूरला मिळाले. मात्र, त्याचे भिजत घोंगडेच कायम आहे. यावर्षी जेमतेम जागा निश्चित झाली आहे. पुढील वर्षी कॉलेज सुरू होईल, अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.
पुणे आणि नागपूरसाठी आयआयआयटीची घोषणा एकाच वेळी करण्यात आली होती. मात्र, पुण्याच्या आयआयआयटीला जागा मिळून ते सुरूही झाले.  नागपुरातील आयआयआयटीसाठीही वर्धा मार्गावर गेल्या महिन्यात जागा निश्चित झाली आहे. आता आयआयआयटी सुरू व्हायला अद्याप किती विघ्ने येतात कुणास ठावूक.
गेल्याच महिन्यात सादर झालेल्या केंद्रीय अंदाजपत्रकात महाराष्ट्रासाठी ‘एम्स’ची घोषणा करण्यात आली. देशात चार नवीन ऑल इंडिया इन्स्टिटय़ुट ऑफ मेडिकल सायन्सेस (एआयआयएमएस) स्थापन करण्यात येणार असून त्यापैकी एक विदर्भात असणार एवढय़ावरच वैदर्भीयांची बोळवण करण्यात आली आहे. विदर्भातील नेमक्या कोणत्या जिल्ह्य़ासाठी एम्स आहे, हे स्पष्टच नाही. यावर्षी केवळ घोषणा करण्यात आली, पण ते केव्हा पूर्णत्वास केव्हा जाईल की, इतर प्रकल्पांप्रमाणे त्याचीही बोळवण करण्यात येईल, हे काळ ठरवेल.