मराठी साहित्यात कादंबरीकार व सिध्दांतकार म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भालचंद्र नेमाडे यांना प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विदर्भातील साहित्य विश्वाने आनंद व्यक्त केला आहे. ज्ञानपीठ पुरस्काराच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांत नेमाडेंना मिळालेल्या या पुरस्कारामुळे भारतीय भाषांत मराठीचे महत्त्वपूर्ण स्थान अधोरेखित झाल्याची प्रतिक्रिया साहित्य वर्तुळात उमटत आहे.
नेमाडे हे आमच्या पिढीतील ज्येष्ठ कादंबरीकार, कवी व सिध्दांतकार आहेत. या पुरस्कारामुळे त्यांचा व मराठी भाषेचा उचित गौरव झाला आहे. मराठी कादंबरीला त्यांनी नवीन वळण दिले. एका संबंध पिढीवर त्यांच्या विचारांचा प्रभाव होता व आहे. भारतीय भाषांमध्ये मराठीला आता नेमाडेंमुळे मान मिळाला आहे. पुरस्काराव्यतिरिक्तही त्यांच्या कर्तृत्वाचा आम्ही मान राखला आहे. साहित्यात त्यांचे मोठे योगदान असून या सर्वोच्च पुरस्कारामुळे मित्रांची अनेक दिवसांची इच्छा पूर्ण झाली आहे, असे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. वसंत आबाजी डहाके म्हणाले.
नेमाडेंना मिळालेला पुरस्कार हा देशीवादी वाङ्मयीन विचारधारेला मिळालेला पुरस्कार आहे. मेदीच्या काळापासून विशिष्ट वाङ्मयीन भूमिका व ध्यास घेऊन त्यांनी कादंबरीलेखन केले आहे. मराठी कादंबरीला साचेबंद, बेगडी पोचटपण आले होते. व्याजतंत्राच्या आहारी गेलेल्या कादंबरी लेखनावर त्यांनी प्रहार केले. केवळ टीका करून न थांबता नव्या वळणाची कादंबरी कशी असावी, यासाठी ‘कोसला’च्या माध्यमातून सशक्त पर्याय उभा केला. आपले जीवन व वाङ्मयीन निष्ठा नेमाडेंनी कादंबरी व समीक्षा लेखनासाठी झोकून दिल्या होत्या. जागतिकीकरणाच्या काळात मराठी भाषेत कसदार साहित्य निर्माण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत व नव्या पिढीला मोलाचे मार्गदर्शनही केले आहे. मराठीला मिळालेला पुरस्कार हा त्यांच्या साधनेचा गौरव आहे. नेमाडेपंथीय म्हणून या पुरस्काराचा शब्दातीत आनंद आहे, असे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कादंबरीकार प्रा. सदानंद देशमुख म्हणाले.
नेमाडे सरांना ज्ञानपीठ पुरस्कार यापूर्वीच मिळणे अपेक्षित होते. या पुरस्काराने पुरस्काराचीच उंची वाढली आहे. मराठी साहित्यातील वास्तववादी व देशीयवादी लेखक असणाऱ्या नेमाडे सरांना हा पुरस्कार लाभल्याने एकूणच मराठी साहित्याच्या दिशा भारतभर विस्तारल्या. कविता, कादंबरी व समीक्षेत अनन्यसाधारण योगदान देणारे ते विचारवंत साहित्यिक आहेत. साठोत्तरी मराठी साहित्यातील ते एक दीपस्तंभ आहे, असे समीक्षक प्रा.डॉ. किशोर सानप म्हणाले.
भालचंद्र नेमाडे यांची साहित्यिक उंची मोठी आहे व मराठी साहित्याला त्यांचे मोठे योगदान आहे. योग्य माणसाला योग्य पुरस्कार मिळाल्याचा आनंद झाला आहे, असे विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर म्हणाले.
आपल्या सगळया साहित्याला देशीपणाचे दमदार अधिष्ठान प्राप्त करून देत असताना एकूणच जीवन व्यापणाऱ्या सर्व व्यवहारात देशीपणाचा आग्रह धरणाऱ्या नेमाडेंची भूमिका वाङ्मयीन विद्रोहाची होती. पहिल्याच कादंबरीत केवळ नायक ही संकल्पनाच नव्हे तर एकूणच कादंबरी विश्वाचा चेहरा बदलण्याचे अद्भूत सामथ्र्य त्यांनी प्रकट केले आहे.  साठोत्तरी मराठी वाङ्मयीन विश्वावर त्यांच्या साहित्य व जीवनदृष्टीचा जो प्रभाव पडला तो आजतागायत एकूण भारतीय साहित्यदृष्टीच्या अपरिहार्य घटक झाला आहे. यामुळेच, ज्ञानपीठ पुरस्काराने झालेला त्यांचा सन्मान सार्थ ठरला आहे, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख व समीक्षक डॉ.अक्षयकुमार काळे म्हणाले.
भारतीय भाषांमधील समकालीन लेखकांपैकी महत्त्वाचे कादंबरीकार, कवी, टीकाकार या तीनही भूमिका नेमाडेंनी निभावल्या आहेत. एखादी कादंबरी व त्या कादंबरीचा नायक अर्धशतकाहून अधिक काळ वाचकांवर अधिराज्य गाजवितो हे अपवादात्मक उदाहरण आहे. कोसला व पांडुरंग सांगवीकर यांनी मराठी अभिरूची, लेखनशैली व मराठी समाजमनापुढे निर्माण केलेले आव्हान आजही कायम आहे. प्रत्येक पिढीला पांडुरंग सांगवीकर आपला वाटला आहे. त्यांनी केलेली देशीवादाची मांडणी, मराठीतीलच नव्हे तर भारतीय भाषांमधील महत्त्वाची घटना आहे. अशा महाकवी, कादंबरीकाराला हा सन्मान मिळाला याचा मराठी वाचक म्हणून अभिमान वाटतो, असे ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. प्रमोद मुनघाटे म्हणाले.