राज्यात शिवसेना सत्तेमध्ये सहभागी होणार असल्यामुळे विदर्भातील शिवसैनिकांची महामंडळांवर वर्णी लागावी, या दृष्टीने अनेकांनी प्रयत्न सुरू केले असून काही प्रमुख पदाधिकारी त्यासाठी मुंबईला रवाना झाल्याची माहिती मिळाली.
विधानसभा निवडणुकीच्यावेळी गेल्या २५ वर्षांपासून असलेली युती संपुष्टात आल्यानंतर दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले. मात्र, विदर्भात शिवसेनेला फारसे यश मिळाले नाही. माजी जिल्हाध्यक्ष शेखर सावरबांधे यांच्यासह अनेक शिवसैनिक त्यावेळी शिवसेनेतून बाहेर पडले त्यामुळे जिल्ह्य़ात शिवसेनेची ताकद कमी झाली होती. भाजपला सर्वात जास्त जागा मिळाल्यामुळे शिवसेना सत्तेत सहभागी होईल की नाही याबाबत साशंकता असल्यामुळे अनेक शिवसैनिक द्विधा मनस्थितीत होते. ज्या शिवसैनिकांनी निवडणुकीच्या काळात बंडखोरी किंवा दुसऱ्या उमेदवाराचे काम केले अशांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. काहींना निलंबित करण्यात आले.  
त्यामुळे गेल्या काही दिवसात विदर्भातील शिवसेनेचे संघटनात्मक काम कमी झाले होते. नुकतेच शिवसेनेने प्रवक्तांची नावे जाहीर केली. मात्र, त्यातही विदर्भातील एकाही नेत्यांचा समावेश नसल्यामुळे प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीची सूर होता. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी शिवसेना सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय झाल्यामुळे विदर्भातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून जे पक्ष सोडून बाहेर पडले होते किंवा ज्यांना पक्षाने निलंबित केले होते ते आता पक्षात सक्रिय झाले आहेत.  शिवसेना सत्तेत सहभागी होणार असल्यामुळे विदर्भातील प्रमुख शिवसैनिकांना महामंडळांवर स्थान मिळावे यासाठी अनेक प्रमुख नेत्यांनी पक्षश्रेष्ठींच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहे. काही शिवसैनिक तर मुंबईला रवाना झाल्याची माहिती मिळाली. विदर्भातून संजय राठोड यांची वर्णी मंत्रिमंडळावर लागण्याची शक्यता असल्यामुळे कार्यकत्यार्ंमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. महामंडळावर वर्णी लागावी यासाठी विदर्भातील शिवसेनेच्या पराभूत उमेदवारांचा समावेश असून त्यातील काहींनी पक्षश्रेष्ठींकडे पत्र पाठवून मागणी केल्याची माहिती मिळाली.
या संदर्भात पक्षाचे पदाधिकारी किशोर कुमेरिया यांनी सांगितले, शिवसेनेने सत्तेत सहभागी व्हावे विदर्भातील कार्यकत्यार्ंना वाटत होते आणि त्या दिवसाची आम्ही सर्व शिवसैनिक वाट पाहात होतो. गेल्या २५ वर्षांंपासून भाजपसोबत असलेली युती संपुष्टात आल्यानंतर विदर्भात संघटनात्मक काम कमी झाले होते. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण नव्हते. मात्र, आता शिवसेना सत्तेत सहभागी होणार असल्यामुळे विदर्भातील शिवसैनिकांची महामंडळांवर नियुक्ती करावी जेणे करून विदर्भातील कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा उत्साह येईल आणि संघटनात्मक काम वाढेल.