विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन १३ व १४ डिसेंबरला महालातील चिटणीस पार्क येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे विदर्भस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कार्यकर्ते व पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार आहेत.
१३ डिसेंबरला सकाळी ११ वाजता झेंडावंदन करून अधिवेशनाला सुरुवात होईल. यानंतर सायंकाळी ६ वाजेपर्यंत विविध विषयावर अभ्यासपूर्ण सत्र चालतील. १४ डिसेंबरला सकाळी १० वाजता अधिवेशनाला सुरुवात होईल. सायंकाळी ४ ते ५ यादरम्यान समारोप होईल. या अधिवेशनासाठी यवतमाळ येथून अ‍ॅड. अजयकुमार चमेडिया यांच्या नेतृत्वाखाली १० वकील व ३० विदर्भवादी कार्यकर्ते अशा ४० कार्यकर्त्यांची पदयात्रा ६ डिसेंबरला दुपारी १२ वाजता नागपूरकडे येण्यास निघाली आहे. अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी या पदयात्रेला हिरवी झेंडी दाखवून नागपूरकडे रवाना केले. यावेळी अ‍ॅड. वामनराव चटप प्रामुख्याने उपस्थित होते. ही पदयात्रा १२ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता व्हेरायटी चौकात येऊन पोहचेल. यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी या पदयात्रेचे स्वागत करणार आहे. हे कार्यकर्ते वेगळे विदर्भ राज्य झालेच पाहिजे, हा संदेश देत व बैठका घेत विदर्भवाद्यांना नागपुरातील अधिवेशनात उपस्थित राहण्याचा आग्रह करणार असल्याची माहिती मुख्य निमंत्रक राम नेवले यांनी दिली आहे. दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात श्रीनिवास खांदेवाले, माजी आमदार वामनराव चटप, सरोजताई काशीकर, प्रबीरकुमार चक्रवर्ती, दीपक निलावार, अरुण केदार, अ‍ॅड. नंदा पराते, दिलीप नरवाडीया यांच्यासह विदर्भातील पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहून विविध विषयावर मंथन करणार आहेत.