विरोधी पक्षात असताना स्वतंत्र विदर्भाची भाषा करणारे आणि निवडणुकीआधी आश्वासन देणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विदर्भाचा सोयीस्करपणे विसर पडला आहे. त्यांच्या या विश्वासघातकी कृताच्या निषेधार्थ १ मे रोजी संपूर्ण विदर्भात त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने पुढाकार घेतला आहे.
नितीन गडकरी यांनी विदर्भाचे दिलेले लेखी आश्वासन, देवेंद्र फडणवीसांनी विदर्भासाठी केलेले आंदोलन व दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून वैदर्भीय जनतेने भाजपाला विदर्भात भक्कम साथ दिली. परंतु दोन्ही नेत्यांनी सोयीस्करपणे स्वतंत्र विदर्भ राज्याच्या प्रश्न विसरून वैदर्भीय जनतेची घोर निराशा केली आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांनीदेखील भाजपच्या कार्यकारिणीचा ठराव व त्यांचा विदर्भाचा जाहीरनाम्यानुसार विदर्भाचा निर्णय घेणे गरजेचे होते. परंतु त्यांनीही भाजपचे आश्वासन पूर्ण केले नाही म्हणून वैदर्भीय जनतेचा या तिन्ही नेत्यांवरील विदर्भासंबंधी दिलेले आश्वासनावरील विश्वास उडला आहे. त्यामुळे वैदर्भीय जनता विदर्भातील ११ जिल्ह्य़ांत या नेत्यांच्या पुतळ्याचे दहन करून निषेध नोंदविणार आहे.
स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने गेल्या तीन वर्षांत अनेक आंदोलन केली. दोन वेळा दिल्लीला जंतर-मंतरवर धरणे आंदोलन झाले. विदर्भातील सर्व खासदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलने झाली. नागपूर करार जाळण्यात आला. केळकर समितीला विरोध करण्यात आला. सभा झाल्या. संमेलने झाली, तरीही राज्य सरकार स्वतंत्र विदर्भाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवत नाही आणि केंद्र सरकारही त्यावर विचार करण्यास तयार दिसत नाही. लोकशाही प्रणालीमध्ये शांततेने होत असलेल्या जन आंदोलनाला सत्ताधारी पक्ष महत्त्वच देत नसेल व जनप्रतिनिधी जनतेचा आवाजच एकेत नसतील तर जनतेलाही लोकप्रतिनिधींबाबत वेगळा विचार करावा लागेल, असे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य निमंत्रक राम येवले म्हणाले.
शहरात समितीच्या वतीने उद्या, शुक्रवारी दुपारी १२ ते १ वाजताच्या दरम्यान व्हरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ या दोन्ही विश्वासघातकी नेत्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात येणार आहे.