लोकसभेच्या निवडणुकीची मरगळ झटकून विदर्भ राज्य आंदोलन समिती स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी पुन्हा रस्त्यावर उतरणार आहे. समितीतर्फे १ मे हा दिवस ‘काळादिवस’ म्हणून पाळणार आहे. याच दिवशी निदर्शने करून कॅन्डल मार्च काढणार असल्याची माहिती समितीचे संयोजक माजी आमदार वामनराव चटप व निमंत्रक राम नेवले यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषदेत दिली. या दिवशी विदर्भवाद्यांनी आपल्या घरावर काळा झेंडा लावून व हातावर काळ्या पट्टय़ा बांधून महाराष्ट्र सरकारचा निषेध करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी १ मे रोजी सायंकाळी ५ वाजता व्हरायटी चौकात निदर्शने करण्यात येईल. यानंतर व्हेरायटी चौक, सीताबर्डी मेन रोड, आनंद टॉकीज, मुंजे चौक, झाशी राणी चौक मार्गे कॅन्डल मार्च काढण्यात येईल. यानंतर व्हेरायटी चौकात कॅन्डल मार्चचा समारोप होईल. यामध्ये पूर्व विदर्भातील विदर्भवादी जनता सहभागी होणार आहेत. विदर्भ राज्य आंदोलन समितीची बांधणी ३० जूनपर्यंत संपूर्ण जिल्ह्य़ात तालुकास्तरावर पूर्ण करण्यात येणार असून जूनच्या शेवटच्या आठवडय़ात नागपुरात विदर्भातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात येणार आहे. या दोन महिन्यात संपूर्ण विदर्भात जनजागृती अभियान राबवण्यात येणार असल्याचेही चटप व नेवले यांनी सांगितले.
समितीचे पुढील आंदोलन हे ‘विदर्भ आंदोलन’ या नावाने चालवण्यात येणार असून त्यासाठी एक झेंडा तयार करण्यात आला आहे. या झेंडय़ाच्या वरील २/३ भाग पांढरा असून १/३ खालचा भाग हा हिरवा आहे. पांढऱ्या भागावर विदर्भाचा नकाशा ठळकपणे झळकत असून विदर्भाची सीमा जाड निळ्या रंगाची आहे. तर आतला भाग आदिवासींचे प्रतीक असलेल्या
पिवळा रंगात असून त्यात मोठय़ा अक्षरात क्रांतिकारक रंग लाल अक्षराने ‘जय विदर्भ’ लिहिले आहे. हिरवा रंग शेतीचे प्रतीक व मुस्लिमांचा विकास, निळा रंग दलितांचा विकास, पिवळा रंग हा आदिवासींचा विकास, पांढरा रंग हा शांतीचे प्रतीक तर त्यावरील लाल रंगाने ‘जय विदर्भ’ हा विदर्भाच्या क्रांतीचे प्रतीक असून यासाठी समिती कटिबद्ध आहे, हे दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे.
विदर्भ राज्य आंदोलन समिती ही त्रिस्तरीय राहणार आहे. मुख्य संयोजन समितीमध्ये २१ लोकांचा समावेश राहणार असून त्यात महत्त्वाचे निर्णय घेतल्या जातील. एक १०१ लोकांची कार्यकारिणी राहणार असून त्यात संपूर्ण विदर्भातील जिल्हावार प्रतिनिधी राहतील. एक विस्तारित कार्यकारिणी राहणार असून त्यात तालुका पातळीपर्यंतचे प्रमुख कार्यकर्ते राहणार आहेत. ‘जय विदर्भ’ असा एक बिल्लाही तयार करण्यात येत असून तो बिल्ला कार्यकर्ते स्वाभीमानाने छातीवर लावतील तसेच आपल्या वाहनावर स्टिकरही लावतील, असेही सांगण्यात आले. यावेळी माजी आमदार सरोजताई काशीकर, निमंत्रक दीपक निलावार, धर्मराज रेवतकर, अ‍ॅड. नंदा पराते, दिलीप नरवाडीया उपस्थित होते.