जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आदी राज्यांत केदारनाथ, बद्रिनाथ, कैलास मानसरोवर यात्रेसाठी विदर्भातून गेलेल्या २८० यात्रेकरूंपैकी २०३ जणांशी संपर्क साधण्या यश आले असले तरी अद्यापही ७७ यात्रेकरूंशी संपर्क झालेला नाही. यात नागपूर विभागातील ६४ आणि अमरावती विभागातील १३ यात्रेकरूंचा समावेश आहे.
केदारनाथ धामयात्रेसाठी नागपूर विभागातून गेलेल्या १७२ यात्रेकरूंपैकी १०८ जणांशी संपर्क झाला आहे. नागपूर जिल्ह्य़ातील रावल परिवारातील ६ सदस्यांशी संपर्क साधण्यात यश मिळाले असून सर्वजण हरसोली मिल्ट्री कँपमध्ये सुरक्षित आहेत. अन्य लोकांशी संपर्क झालेला नाही. अमरावती विभागातून यात्रेला गेलेल्या १०८ पैकी ९५ यात्रेकरूंशी संपर्क साधण्यात यश आले आहे. त्यांची यादी प्रशासनाने जाहीर केली आहे.
बुटीबोरी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी मिलिंद ठेंगडींसह त्यांच्या कुटुंबाला उत्तराखंडातील पूरस्थितीचा फटका बसला असून ते अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने उपवनसंरक्षक प्रकाश महाजन यांनी चिंता व्यक्त केली.
रिसोड येथील व्यापारी पुरुषोत्तम तोष्णीवाल, सुरेखा तोष्णीवाल आणि प्रज्ञून तोष्णीवाल हे तिघे चारधाम यात्रेला गेले होते. १६ जूनला सायंकाळी ‘रामबाडा’ येथून त्यांचा कुटुंबासोबत फोनद्वारे संपर्क झाला. त्यानंतर मात्र त्यांचा संपर्क न झाल्याने रिसोड येथील तोष्णीवाल कुटुंबीय हवालदिल झाले आहे.
 यवतमाळ येथून गेलेले ३७ भाविक सुरक्षित असून बुधवारी त्यांना दिल्ली येथे सुखरूप आणण्यात आले आहे. चिंतामणी टूर अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्सकडून हे भाविक सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. या सर्वाची व्यवस्था दिल्लीत करण्यात आली असून सर्व भाविक लवकरच यवतमाळात पोहोचणार आहेत. या भाविकांमध्ये १३ महिलांचाही समावेश आहे.
मृत्यू जवळ येऊनही माघारी फिरला..
संजय देशपांडेंनी थरार अनुभवला
राम भाकरे, नागपूर
गोविंघाट ते हरिद्वापर्यंत मार्गावरील ते चार दिवस.. मुसळधार पाऊस.. रस्त्यावर अंधार.. समोर आणि मागे सात-आठ किमी पर्यंत गाडय़ांची रांग.. कधी गाडीवर दगड कोसळल्याचा आवाज तर कधी गाडी हलत असल्याचा भास.. प्रत्येक जण जीव मुठीत घेऊन गाडीत बसलेला.. मृत्यू अगदी समीप आला होता पण, वेळ आली नव्हती. नशीब बलवत्तर असल्यानेच सुखरूप आपल्या मायभूमीत परत आलो..
गेल्या २३ वर्षांपासून चारधाम यात्रा करणारे नागपूरचे जुना सुभेदार लेआऊटमध्ये राहणारे संजय देशपांडे ‘लोकसत्ता’शी बोलताना उत्तराखंडमधील भयंकर अनुभव सांगत होते. उत्तराखंडची चारधाम यात्रा करण्यासाठी जगभरातून दरवर्षी मोठय़ा संख्येने हिंदू पर्यटक जातात. यावेळी उत्तराखंडला झालेला जलप्रलय महाभयंकर असून अख्खा भारत हादरला आहे. नागपूरचे १७२ यात्रेकरूया नैसर्गिक आपत्तीत सापडले होते. त्यापैकी ६ लोक सुखरुप बुधवारी रात्री परतले आहेत. संजय देशपांडे गेल्या २३ वर्षांपासून ते केदारनाथ-ब्रदीनाथला यात्रा करीत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत नागपूर, अमरावती आणि जळगावचे एकून ६५ प्रवासी होते. या महाप्रलयाने माजविलेल्या हाहाकाराचे थरारक अनुभव सांगताना संजय देशपांडे अक्षरश: शहारले होते. मृत्यूच्या जबडय़ातून बाहेर पडलो, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
गेल्या ४ जूनला नागपूरवरून निघाल्यावर १५ जूनपर्यंत हरिद्वार, केदारनाथ, ब्रद्रीनाथमधील विविध तीर्थस्थळाना भेटी देऊन १५ जूनला ब्रदीनाथवरून परतीच्या प्रवासाला निघालो असताना गोविंदघाटजवळ रात्रीच्यावेळी एकच हाहाकार उडाला आणि सगळीकडे पाणीच पाणी दिसू लागले. जवळपास रात्री १ वाजेपर्यंत गाडी गोविंदघाटमध्ये थांबली असल्यामुळे गाडीतून कोणीही बाहेर पडू नये, असे सांगण्यात आले. समोर सगळे मार्ग बंद करण्यात आले होते. खाली उतरून बघितले तर समोर आणि मागे सात ते आठ किमी पर्यंत गाडय़ांची रांग लागली होती. जसजसा रस्ता मोकळा होत होता तशी आमची गाडी समोर जात होती. आजूबाजूच्या गावामध्ये घरे पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळत होती, नदीच्या प्रवाहाबरोबर गाडय़ा, माणसे वाहताना दिसत होती.
सगळीकडे एकच हाहाकार उडाला होता. प्रत्येकजण जीव मुठीत घेऊन बसला होता. पहाटे २ वाजता गोविंदघाटमधून गाडी निघाली. गोविंदघाट ते हरिद्वार हा जवळपास ३३० किमीचा प्रवास पार करायला चार दिवस लागले. मात्र, या चार दिवसात सगळ्यांची झोप उडाली होती. सोबत अनेक वयोवृद्ध आणि लहान मुले होती. देवप्रयागवरून व्यासीला जाताना रात्राच्यावेळी समोर सगळे रस्ते उखडले होते. दरडी कोसळत होत्या. आजूबाजूच्या गावातील घरे पाण्यावर तरंगत होती.
लोक मदतीसाठी याचना करीत होते. दरीपासून केवळ पाच फूट अंतरावरून गाडी जात असताना एक मोठा दगड बसच पुढय़ात येऊन आदळला. त्यावेळी साक्षात मृत्यू समोर उभा झाला होता. खाली खोल दरी होती, बस कोसळते की काय असे वाटत होते. दोन रात्री आणि दोन दिवस डोळासुद्धा लागला नव्हता. अनेकांनी तर जगण्याची आशाच सोडली होती. कुणाचे मोबाईल लागत नव्हते त्यामुळे संपर्क होत नव्हता. सगळीकडे अंधार होता. गाडीखाली उतरावे तर ते शक्य नव्हते. केवळ परमेश्वरांच्या कृपेने आम्ही बचावलो. देवप्रयाग ते व्यासी हा मार्ग पार करताना सगळेच जीव मुठीत घेऊन बसले होते. या प्रवासात काही ज्येष्ठ लोकांची प्रकृती बिघडली होती मात्र त्यांच्याजवळ औषधी असल्यामुळे त्यांना काही काळ आराम पडला होता.
श्रीकांत गोयल, विक्रम देव, जयंत मानेगावकर हे तिघे आजारी पडले होते त्यामुळे ते दिल्लीला थांबले आहेत. १५ जूनला ब्रद्रीनाथवरून निघालो त्यावेळी जवळपास १५ ते २० हजार र्पयटक मदिर परिसरात होते मात्र असा हाहाकार होईल असे स्वप्नात वाटले नव्हते. विदर्भातून मोठय़ा प्रमाणात पर्यटक केदारनाथ आणि बद्रीनाथला वेगवेगळ्या ट्रॅव्हल कंपन्यांच्या माध्यमातून आले होते. त्यातील अनेक लोक भेटले. मात्र त्यांच्याशी काही संपर्क होऊ शकला नसल्याचे देशपांडे यांनी सांगितले.
यात्रेकरूंच्या माहितीसाठी हेल्पलाईन
जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात २४ तास आपात्कालीन कक्ष सुरू करण्यात आला आहे. ज्यांचे नातेवाईक उत्तराखंडमध्ये यात्रेला गेले आणि त्यांच्याशी काही संपर्क होत नाही अशांनी ०७१२-२५६२६६८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.

चंद्रपूर जिल्ह्य़ातील  ९ पैकी ६ जणांशी संपर्क
*जिल्हा महिला व बालकल्याण अधिकाऱ्याचा ठावठिकाणा नाही
केदारनाथ यात्रेला गेलेल्या चंद्रपूरच्या जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी स्मिता पौनीकर (४२) यांचा ठावठिकाणा लागत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांसह जिल्हा प्रशासनातील अधिकारी चिंताग्रस्त झाले आहेत. जिल्ह्य़ातील नऊ जण या यात्रेत सहभागी झाल्याची माहिती आज समोर आली असून यातील सहा जणांशी संपर्क झाला, तर उर्वरित तीन जणांशी अजूनही संपर्क झाला नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. जिल्ह्य़ातून नऊ यात्रेकरू सहभागी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यात जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी स्मिता पौनीकर यांच्यासह चंद्रपुरातील करुणा शोभावत, सुरेंद्र शोभावत, मनाली शोभावत, पीयूष वैष्णव, बल्लारपूर येथील कमल अट्टल (५१), अक्षय अट्टल (४५) व वरोरा येथील रमेश ठवकर व त्यांची पत्नी, अशा नऊ लोकांचा समावेश होता. सोमवारपासून या नऊ जणांचा ठावठिकाणा नव्हता. विविध वृत्तवाहिन्यांवर केदारनाथ येथील महाप्रलयाचे वृत्त झळकताच संबंधित यात्रेकरूंच्या कुटुंबीयांनी जिल्हा प्रशासनाला या नऊ लोकांचा ठावठिकाणा लागत नसल्याची माहिती दिली. जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी स्मिता पौनीकर यांचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज अट्टल यांच्या बल्लारपूर येथील निवासस्थानी दूरध्वनी करून अधिक माहिती घेतली असता दोन दिवसांपासून संपर्क झाला नसल्याचे त्यांनी कळविले आहे. या सर्वाची माहिती घेण्याचे काम प्रशासनाच्या वतीने युध्दपातळीवर सुरू आहे, तर शोभावत व ठवकर कुटुंबीयांशी संपर्क झाला असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. या दोन्ही कुटूंबातील सदस्यांनी स्थानिक नातेवाईकांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून ते सुखरूप असल्याचे कळवले, तसेच जिल्हा प्रशासनाला टोल फ्री नंबरवर संपर्क साधून व जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर, निवासी उपजिल्हाधिकारी पी.डी.बडकेलवार यांच्या कार्यालयात सुखरूप असल्याची माहिती दिली.