News Flash

आता उमेदवारांचा ‘छुपा’ प्रचार

डीजेवर घोंघावणारा आवाज.. गलोगल्ली फिरणारे ऑटोरिक्षा, उघडय़ा जिप्स, हातात झेंडे किंवा निवडणूक चिन्ह घेऊन घोषणा देणारे कार्यकर्ते, असे दृष्य गेल्या बारा-तेरा दिवसांपासून शहरातील विविध भागात

| October 14, 2014 07:25 am

डीजेवर घोंघावणारा आवाज.. गलोगल्ली फिरणारे ऑटोरिक्षा, उघडय़ा जिप्स, हातात झेंडे किंवा निवडणूक चिन्ह घेऊन घोषणा देणारे कार्यकर्ते, असे दृष्य गेल्या बारा-तेरा दिवसांपासून शहरातील विविध भागात होते. ही नागरिकांची कान पिकवणारी प्रचाराची रणधुमाळी सोमवारी सायंकाळी शांत झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी आता ‘छुपा’ प्रचार आपापल्या मतदारसंघात सुरू केला आहे.
जिल्ह्य़ात राजकीय पक्षाच्या प्रचाराला शुभारंभ झाल्यानंतर केंद्रीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांच्या प्रचार सभा झाल्या. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात ढोलताशांच्या निनादात स्कुटर मिरवणुका काढून नागरिकांशी जनसंपर्क केला. प्रचार संपण्याच्या आधी भाजपतर्फे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जाहीरसभा झाल्या, तर भोजपुरी गायक मनोज तिवारी यांची पश्चिम नागपुरात आणि काँग्रेसतर्फे नेते राज बब्बर यांनी उत्तर आणि पूर्व नागपुरात ‘रोड शो’ करून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. प्रचाराला काही तास शिल्लक असताना जाहीर प्रचारासाठी मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करण्याच्या दृष्टीने उमेदवार आणि त्याचे स्टार प्रचारक जीवाचे रान करून मैदानात उतरले. यामुळे सकाळपासूनच शहरातील विविध भागात प्रचाराची धूम होती. काही भागात स्कूटर मिरवणुका, तर काही प्रभागात घरोघरी जनसंपर्क करून नागरिकांशी संवाद साधण्यात आला. शेवटची पदयात्रा किंवा मिरवणुकीसाठी कार्यकर्ते जमवण्यापासून त्यांची बडदास्त ठेवण्यापर्यंत उमेदवारांनी व्यवस्था केली होती.
प्रचारासाठी मिळालेला अवधी वाया न जाऊ देता विविध पक्षांच्या उमेदवारांनी प्रचार करून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत कसे पोहोचता येईल, त्यादृष्टीने प्रयत्न केले. गेल्या आठ दिवसांपासून शहरात विविध पक्षातील स्टार प्रचारकांच्या जाहीरसभा झाल्या. नागपूर जिल्ह्य़ात २११ उमेदवार असून सर्वच राजकीय पक्षातील उमेदवारांनी प्रचारासाठी आवश्यक सर्व माध्यमांचा वापर केला. आज शहरातील विविध भागात स्कुटरवरून मिरवणुका काढण्यात आल्यामुळे कार्यकर्त्यांंसाठी पेट्रोलची सोयसुद्धा त्या त्या उमेदवारांनी केली होती. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांंनी दोन ते तीन लिटर पेट्रोल गाडीत भरून घेतले.
शहरातील काही ठराविक पेट्रोल पंपांवर आज सकाळी मोठय़ा प्रमाणात कार्यकर्त्यांंची गर्दी असल्यामुळे सामान्य नागरिकांना बराच वेळ थांबावे लागले. अनेक मतदारसंघांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या स्कुटर मिरवणुका एकमेकांसमोर आल्याचे चित्र शहरात होते.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2014 7:25 am

Web Title: vidhansabha election
टॅग : Election,Nagpur,Vidarbh
Next Stories
1 बौद्ध भिक्खू भदंत महापंथ निवडणुकीच्या मैदानात
2 अपक्षांच्या भाऊगर्दीत मोजकेच ‘सक्षम’
3 सोनिया गांधींच्या सभेनंतर ब्रम्हपुरीतील लढत ‘हाय प्रोफाईल’
Just Now!
X