News Flash

माजी आमदारांच्या उमेदवारीने लढतींमध्ये चुरस

जिल्ह्यातील अनेक माजी आमदार पुन्हा एकदा विधानसभेत जाण्यासाठी उत्सुक असून या माजी आमदारांच्या उमेदवारीमुळे अनेक मतदारसंघांमधील लढती अत्यंत चुरशीच्या झाल्या आहेत.

| October 14, 2014 07:00 am

जिल्ह्यातील अनेक माजी आमदार पुन्हा एकदा विधानसभेत जाण्यासाठी उत्सुक असून या माजी आमदारांच्या उमेदवारीमुळे अनेक मतदारसंघांमधील लढती अत्यंत चुरशीच्या झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत त्यांची कामगिरी कशी राहील, याकडे सर्वाचे लक्ष आहे.
युती आणि आघाडी बिनसल्यामुळे अनेक इच्छुकांची निवडणुकीस उभे राहण्याची स्वप्नपूर्ती झाली. बहुतेक पक्षांनी माजी आमदारांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली. त्यात नांदगाव मतदारसंघात काँग्रेसचे अनिल आहेर, चांदवडमध्ये राष्ट्रवादीचे उत्तमबाबा भालेराव, कळवणमध्ये माकपचे जीवा पांडु गावित, निफाडमध्ये राष्ट्रवादीचे दिलीप बनकर, इगतपुरीत अपक्ष काशिनाथ मेंगाळ, शिवसेनेचे शिवराम झोले, दिंडोरीतून राष्ट्रवादीचे नरहरी झिरवळ, काँग्रेसचे रामदास चारोस्कर आदींचा समावेश आहे. माजी आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने त्यांना उमेदवारी देणाऱ्या राजकीय पक्षांचे बरेचसे काम हलके होत असल्याचा अनुभव पदाधिकाऱ्यांना आहे. प्रचाराची रणनीती आखण्यापासून मतदानाच्या दिवशी कसे नियोजन करावे, यासंदर्भातील सर्व माहिती या उमेदवारांकडे असल्याने पदाधिकाऱ्यांना निश्िंचत राहता येते. शिवाय या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वतंत्ररित्या मैदानात उतरलेले असल्याने नवख्या उमेदवारापेक्षा माजी आमदाराची असलेली मतदारसंघातील ओळख पक्षासाठी लाभदायक ठरत आहे. या माजी आमदारांनी आपआपल्या मतदारसंघात इतर उमेदवारांपुढे चांगलेच आव्हान उभे केल्याचे दिसत आहे.
नांदगावमध्ये काँग्रेसचे अ‍ॅड. अनिल आहेर यांनी इतर प्रमुख उमेदवारांच्या तुलनेत आपणच केवळ स्थानिक असल्याने इतरांपेक्षा आपणास मतदारसंघातील समस्यांची अधिक जाणीव असल्याचे सांगत याच मुद्यावर प्रामुख्याने आपल्या प्रचाराचा रोख ठेवला. चौरंगी लढतीमुळे या मतदारसंघात विजयाचे समीकरण कोणासाठी अनुकूल राहील, हे सांगणे कठीण झाले आहे. निफाडमध्ये राष्ट्रवादीने दिलीप बनकर यांना उमेदवारी दिली आहे. विद्यमान आमदारांची कार्यशैली आणि स्वत:च्या पिंपळगाव बसवंत गावातील मतदारांवर बनकर यांनी अधिक भर दिला आहे. मतदारसंघात पिंपळगावची मतदारसंख्या सर्वाधिक आहे. त्याखालोखाल विद्यमान आमदार अनिल कदम यांचे गाव असलेल्या ओझरचा नंबर लागतो. गटातटाच्या राजकारणासाठी या मतदारसंघातील निवडणूक सदैव ओळखली जाते. कळवण-सुरगाणा मतदारसंघात माकपचे उमेदवार जीवा पांडु गावित यांची सुरगाणा या आपल्या तालुक्यातील पारंपरिक मतदानावर अधिक भिस्त आहे. कळवण तालुक्यात होणाऱ्या मत विभागणीचा लाभ होण्याची आशा ते बाळगून आहेत. इगतपुरीत शिवराम झोले हे यावेळी शिवसेनेकडून नशीब अजमावित आहेत. तर, उमेदवारीच्या आशेने निवडणुकीच्या तोंडावर मनसेतून शिवसेनेतून आलेले काशिनाथ मेंगाळ हे उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. चांदवड-देवळा मतदारसंघात राष्ट्रवादीने उत्तमबाबा भालेराव यांना पुन्हा रिंगणात उतरविले. देवळ्यापेक्षा चांदवड तालुक्यातील मतदारांवर त्यांची अधिक भिस्त आहे. दिंडोरी मतदारसंघातून राष्ट्रवादीने पुन्हा एकदा नरहरी झिरवळ यांना संधी दिली आहे. तर, रामदास चारोस्कर राष्ट्रवादीची उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसचे उमेदवार झाले आहेत.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2014 7:00 am

Web Title: vidhansabha election 2014 2
टॅग : Election,Nashik
Next Stories
1 शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे भाजपचे धोरण -शरद पवार
2 सत्ता मिळाल्यास शेतकऱ्यांना न्याय देणार – उद्धव ठाकरे
3 विधानसभा निवडणूक : कर्मचाऱ्यांना मिळणार घसघशीत निवडणूक भत्ता
Just Now!
X