News Flash

अमरावतीत पक्षांचे जातीय मतविभागणीकडे लक्ष

महायुती व आघाडीच्या विभाजनानंतर अनेक ठिकाणी चौरंगी लढतीचे चित्र असताना विविध राजकीय पक्षांनी जातीय मतविभागणीकडे लक्ष केंद्रित केले असून कुणबी, माळी, धनगर, मुस्लिम आणि दलित

| October 14, 2014 07:19 am

महायुती व आघाडीच्या विभाजनानंतर अनेक ठिकाणी चौरंगी लढतीचे चित्र असताना विविध राजकीय पक्षांनी जातीय मतविभागणीकडे लक्ष केंद्रित केले असून कुणबी, माळी, धनगर, मुस्लिम आणि दलित जनाधार गोळा करण्यासाठी उमेदवारांमध्ये चुरस आहे. गेल्या काही निवडणुकांपासून अमरावती मतदारसंघात मुस्लिम मते निर्णायक ठरत आल्याने काँग्रेसने ही गठ्ठा मते आपल्याकडे वळवण्यासाठी धावपळ चालवली आहे. मुस्लिमबहुल भागातील सर्वाधिक सभांमधून त्याचे संकेत मिळाले आहे.
भाजपचा कुणबी मतांच्या धृवीकरणावर डोळा आहे. शिवसेना कुठे नुकसान करू शकते, याकडे भाजप वर्तुळाचे लक्ष आहे.
अमरावतीत काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढतीचे चित्र असताना जातीय मतविभागणी निर्णायक ठरणार आहे. बडनेरा मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी समर्थित अपक्ष, शिवसेना, भाजप, अशा चौरंगी लढतीत दलित-मुस्लिम जनाधार आपल्याकडे वळवण्यासाठी संघर्ष आहे. काँग्रेसला परंपरागत समर्थक मते खेचण्यासाठी अधिक परिश्रम करावे लागणार नसले, तरी राष्ट्रवादीला अधिक मेहनत घ्यावी लागत आहे. भाजपला मध्यमवर्गीय बहुजनांचा आधार आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये कमकुवत झालेल्या संघटनात्मक बांधणीमुळे शिवसेनेसमोर मतविभागणी रोखण्याचे आव्हान आहे. दर्यापूर मतदारसंघात दलित आणि दलितेतर मतांची विभागणी कशा पद्धतीने होते, यावर शिवसेनेसह रिपाइं, काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. भारिप-बमसंने दावेदारी पुढे करून रिपाइं गवई गटाच्या अडचणी वाढवल्या आहेत.
अचलपूर मतदारसंघात कुणबी मतांचे सर्वाधिक विभाजन अपेक्षित आहे. माळी समाजाच्या गठ्ठा मतांवर भाजपची मदार आहे. मुस्लिम मतांना खुणावत काँग्रेसने वाटचाल सुरू केली आहे, पण दलित मतांमधील फूट ही काँग्रेससाठी डोकेदुखी ठरली आहे. अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्यासमोर सामाजिक जनाधार टिकवण्याचे आव्हान आहे. मोर्शी या कुणबीबहुल मतदारसंघात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीत ही मते पारडय़ात पाडून घेण्यासाठी चढाओढ आहे. शिवसेना मतांसाठी चाचपडत असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये मुस्लिम मते ओढण्याची स्पर्धा आहे. तिवसा याही कुणबीबहुल मतदारसंघात सर्वाधिक उमेदवार याच वर्गात मोडणारे आहेत.
 या मतांचे विभाजन अटळ असले, तरी विजयाच्या समीप असणाऱ्या उमेदवाराकडे अखेरच्या क्षणी ही मते वळतात, हा पूर्वानुभव असल्याने प्रभाव दाखवण्यासाठी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपत स्पर्धा आहे.
धामणगाव रेल्वे मतदारसंघात थेट लढतीचे चित्र असताना दलित आणि तेली मते निर्णायक ठरणार आहेत. भाजप आणि काँग्रेसचे भवितव्य या मतांच्या धृवीकरणावर अवलंबून आहे.
मनसे, भारिप-बमसं आणि इतर पक्ष आपला जनाधार वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत.
मेळघाटात जातीय मतांपेक्षा वैयक्तिक करिष्म्यावर जय-पराजय अवलंबून असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार आपला जनाधार एकवटण्यासाठी परिश्रम घेत आहेत. भाजपला येथे कोणते स्थान मिळते, याचे औत्सूक्य राजकीय वर्तुळात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2014 7:19 am

Web Title: vidhansabha election amravati
टॅग : Election,Nagpur,Vidarbh
Next Stories
1 आर्वीत आ. केचे-काळे लढत, हिंगणघाटात आ. शिंदेंपुढे आव्हान
2 सावनेरमध्ये सुनील केदारांच्या विरोधात
3 दक्षिण नागपुरात काटय़ाची पंचरंगी लढत
Just Now!
X