News Flash

भर उन्हात.. प्रचाराच्या रणात!

‘आवाज कुणाचा..’, ‘येऊन येऊन येणार कोण..’, ‘छत्रपतींचा आशीर्वाद..’ अशा घोषणांनी सगळीच मुंबई सोमवारी दुमदुमून गेली.

| October 14, 2014 06:14 am

‘आवाज कुणाचा..’, ‘येऊन येऊन येणार कोण..’, ‘छत्रपतींचा आशीर्वाद..’ अशा घोषणांनी सगळीच मुंबई सोमवारी दुमदुमून गेली. सोमवारी सायंकाळी प्रचाराची मुदत संपत असल्याने सकाळपासून प्रचाररथ, राजकीय पक्षांचे झेंडे मिरवत धावणाऱ्या मोटरसायकल, राजकीय पक्षांचे नाव आणि निषाणी असलेल्या पांढऱ्या, भगव्या टोप्या, गळ्यामध्ये पक्षनामोल्लेख केलेली उपरणी आणि मुखाने उमेदवाराच्या नावाचा जप करीत निघालेल्या पदयात्रा दिवसभर धावत होत्या. एरवी दुपारी थोडीशी विश्रांती घेतली जायची. पण प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने कडाक्याचे उन आणि अस’ा उकाडा असूनही उमेदवार-कार्यकर्ते प्रचाराच्या रणात सर्व जोर लावून झुंजत होते. छोटा भीम, मिकी माऊस, डोनाल्ड डकचा समावेश करीत उमेदवारांचा ‘कार्टून नेटवर्क’ प्रचार सुरू होता. तर काहींनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डमीच प्रचारयात्रेत उभी केली. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी प्रत्येक उमेदवार शक्तिप्रदर्शनासाठी तहानभूक विसरून घाम गाळत होता. पण प्रचारयात्रा, पदयात्रांमुळे अनेक भागात वाहतुकीचा कोंडमारा झाला आणि मतदारराजाच अगतिक झाला. तर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांवरही प्रचंड ताण पडला होता.
महायुती आणि आघाडीच्या घोळामुळे सर्वच पक्षांना प्रचारासाठी खूपच कमी वेळ मिळाला. त्यामुळे कमी काळात अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना अविश्रांत मेहनत घ्यावी लागली. त्यामुळे अनेक उमेदवारांनी वेळप्रसंगी पाण्यासारखे पैसे फेकून कार्यकर्त्यांची फौज जमा केली. एरवी नेत्यांच्या थाऱ्यालाही उभे न राहणारे कार्यकर्ते त्यांच्या प्रचारयात्रेत दिसत होते. नेते, समाजसेवक, स्थानिक प्रतिष्ठीत मंडळी, ज्येष्ठ नागरिकांसोबत प्रचार रथावरून मतदारांना आवाहन करीत उमेदवार फिरत होते. राजकीय पक्षांचे ध्वज फडकवित मोटारसायकलवर स्वार झालेले असंख्य तरुण प्रचार रथाच्या मागून हळूहळू पुढे सरकत होते. मोटरसायकलमध्ये उमेदवाराकडून ५०० रुपयांचे पेट्रोल टाकून मिळत असल्याने आणि प्रचारफेरीत मिरवण्यास मिळणार असल्याने मोठय़ा संख्येने तरुण त्यात सहभागी झाले होते. त्याशिवाय सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि ३०० ते ५०० रुपयांची बिदागी मिळणार असल्याने तरुणही खुष दिसत होते.
काही ठिकाणी उमेदवारांनी प्रचारयात्रा आखल्या होत्या. तर त्याचवेळी अन्य विभागांमध्ये उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी पक्ष चिन्ह, झेंडे, नेत्यांच्या छायाचित्रांनी सजविलेल्या गाडय़ा फिरत होत्या. बोरिवली परिसरात तर छोटा भीम, मिकी माऊस, डोनाल्ड डक आदींना प्रचारयात्रेत सहभागी करून मतदारांचे लक्ष आपल्याकडे वेधण्याचा प्रयत्न उमेदवार करीत होते. तर कांदिवलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डमीला प्रचारयात्रेतमध्ये सहभागी करून घेण्यात आले होते.
अवघी मुंबापुरी प्रचाराच्या रणधुमाळीने दुमदुमली होती. परिणामी अनेक भागांमधील वाहतुकीला फटका बसला होता. प्रचारयात्रांमागे वाहनांची लांबच लांब राग लागली होती. प्रचारयात्रांमुळे खोळंबा होत असल्याने अनेक नागरिक उमेदवारांच्या नावाने बोटे मोडत होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2014 6:14 am

Web Title: vidhansabha election campaigning
टॅग : Election
Next Stories
1 सुतळी बॉम्बचा आवाज ‘बसला’! रॉकेटचा आवाज मात्र ‘गगनभेदी’
2 विद्यार्थ्यांचे मतदान जागृती अभियान
3 कुख्यात गुंड भरत शेट्टी अखेर गजाआड
Just Now!
X